
कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना लाखमोलाचा पुरस्कार देणाऱया क्रीडाप्रेमी शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरू झालेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएल, सीजीएसटी, मुंबई बंदर संघांनी जोरदार विजयाची नोंद केली. तसेच महिलांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत श्रीराम (पालघर), धर्मवीर (नंदुरबार) आणि स्वस्तिक कबड्डी संघांनी दणदणीत विजयासह जबरदस्त सलामी दिली. या स्पर्धेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सोमवारी उपस्थित राहून कबड्डीपटूंना प्रोत्साहन देणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन कबड्डीच्या मॅटसंग्रामाचे विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी’त हजारो कबड्डीप्रेमींच्या उपस्थितीत कबड्डीचा दम घुमू लागला. राज्यातून आलेले 18 व्यावसायिक पुरुष संघ आणि महिलांच्या 15 बलाढय़ संघांच्या सहभागाने या स्पर्धेत जेतेपदाचा संघर्ष अधिक प्रबळ झाला आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने श्रीमान योगी प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बहुतांश लढती एकतर्फीच झाल्या. इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा. लि. (आयएसपीएल) संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत रुपाली ज्वेलर्सचा 60-21 असा धुव्वा उडवला. शिवम गोरडे, आदेश वरखडे आणि गिरिराज सिंह यांच्या तुफानी चढाया व अचूक पकडींमुळे मध्यंतरालाच 32-10 अशी आघाडी घेत सामना एकतर्फी केला. दुसऱया सामन्यात सीजीएसटीने हिंदुजा रुग्णालयावर 56-17 असा एकतर्फी विजय मिळवत आपला आक्रमक अंदाज दाखवला. मुंबई बंदरानेही मुंबई महानगरपालिकेवर 38-21 अशी सहज मात करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली.
महिलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेतही संघांनी जोरदार खेळ सादर केला. होतकरू मित्र मंडळ आणि कर्नाळा स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना मात्र खऱ्या अर्थाने रंगला. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या होतकरू संघाने मध्यंतरानंतर जबरदस्त पुनरागमन करत 27-25 असा थरारक विजय मिळवला. पालघरच्या श्रीराम संघाने स्नेहविकासवर 44-13 असा दणदणीत विजय मिळवला, तर नंदुरबारच्या धर्मवीर संघाने जय भारतचा 44-16 असा पराभव करत प्रभावी सलामी दिली. स्वस्तिक महिला संघाने पुण्याच्या पतंगराव कदम संघावर 20-11 अशी मात करत आपल्या धडाकेबाज विजयाची नोंद केली.





























































