
>> संध्या शहापुरे
ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षाला मार्तंड-सूर्य आपल्या प्रकाशाने वाट दाखवतो त्याप्रमाणेच भक्ताच्या संकटाला स्वामी धावून जातात. हरिभक्तीचा डंका वाजतोय भक्तीचा जयजयकार होतोय की रामराया कधीच भक्ताची उपेक्षा करीत नाही. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. यातील चक्रवाक पक्षाची कथा खरंतर सर्वश्रुत आहे. चक्रवाक आणि सारस या पक्षांच्या जोडय़ा जुळल्या की आयुष्यभर एकमेकांच्या विश्वासाने ते वावरतात. त्यांना विरह सहन होत नाही. मादी आणि नर सोबतच विहार करताना दिसतात. पण रात्री मात्र त्यांचा वियोग होतो एक ऐलतीरावर तर दुसरा पैलतीरावर भटकतो. दोघे विरहाने रात्रभर आक्रंदत राहतात. सूर्य उगवल्यावर अंधार विरतो आणि उजेडात आपला जोडीदार त्यांना सापडतो. या संकेताचे दाखले अनेक ग्रंथातून दिले गेले आहेत. त्याला आध्यात्मिक संदर्भ दिला आहे. महानुभाव पंथाच्या ‘अज्ञात लीळा’ या ग्रंथात ‘चक्रवाकानुवादे गुरुशिष्य अज्ञान संवाद’ या लीळेत चक्रवाकाविषयी नोंद आहे. अध्यात्मिक स्पष्टीकरण देण्यासाठी हा चक्रवाक पक्षाचा संकेत दिला जातो. यासाठी गुरुरूपी विवेकाचा दिवा (म्हणजे सूर्यदेव उजेड पाडून पक्षांना जसं मार्ग दाखवतो त्याचप्रमाणे) भक्तीमार्ग दाखवून अद्वैत-जीव शिव ऐक्याचा, समरसतेचा यथार्थ बोध करून देत असतो.तर कधी भक्त प्रल्हादासाठी नरसिंहाचा अवतार घेतो.



























































