
वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरातील अवैध मशिदीवरील तोडकामाचा बदला घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी पद्धतशीर आखणी करण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या तपासातून उघड झाली आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गरीबनगर परिसराची रेकी करून तेथील पोलीस बंदोबस्ताचे व्हिडीओ आणि छायाचित्रे पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलर्सना पाठवली होती. कारवाईदरम्यान तैनात असलेले पोलीस कर्मचारी तसेच काही नागरिक त्यांच्या टार्गेटवर होते. तपासात हा कट पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी, यावर खान आणि अंडरवर्ल्डशी संबंधित मुन्ना झिंगाडा यांनी रचल्याचे समोर आले आहे. मुन्ना झिंगाडा हा छोटा शकीलचा निकटवर्तीय मानला जातो.
दिल्ली स्पेशल सेलने 27 मे रोजी मुंबईतील कुर्ला येथून साजिद महबूब शेख ऊर्फ अरबाज खान आणि ठाणे जिह्यातील मुंब्रा येथून तौकीर रिजवान शेख याला अटक केली. तपासात या दोघांनी दादर रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दीच्या पुलाचीही रेकी केल्याचे समोर आले आहे. आरोपींच्या फोनमध्ये मुंबईतील विविध ठिकाणांचे व्हिडीओ तसेच पाकिस्तान आणि दुबईतील हँडलर्ससोबतचे चॅट्स व व्हॉइस नोट्स आढळून आले.
हुजैफाचा शोध सुरू
हुजैफा नावाच्या मुंबईतील एका संशयित व्यक्तीने स्थानिक तरुणांची या मॉडय़ूलमध्ये भरती केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत.
स्थानिक संपर्कांचा तपास
या प्रकरणानंतर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सतर्क झाले असून या नेटवर्कच्या स्थानिक संपर्कांचा सखोल तपास सुरू आहे.
मुन्ना झिंगाडा कोण?
मुन्ना झिंगाडा सध्या कराची येथून कार्यरत असल्याचा संशय असून तो या संपूर्ण कारवाईचे समन्वयन करत होता, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. 2000 मध्ये दाऊदच्या सांगण्यावरून त्याने बँकॉक येथे छोटा राजनवर हल्ला केल्याचा आरोप आहे.




























































