18 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले पण पंतप्रधान बेफिकीर, वडेट्टीवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट (यूजी) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशातील सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान या गंभीर विषयाबाबत चिंतित नसल्याचा आरोप त्यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले की, “आज 18 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याची चिंता असल्याचे दिसत नाही. राहुल गांधी यांनी जे सत्य सांगितले आहे, तेच आज देशात घडत आहे. लोकशाहीची पायमल्ली करून देश हिटलरशाही पद्धतीने चालवण्याचे काम सुरू झाले आहे.”

नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांमुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला.

दरम्यान, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “निवडणुका संपल्या असून आता जनतेची लूट सुरू झाली आहे. मोदी सरकारने देशाची वाट लावली आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योजकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.