आजच्या भाजपकडून तत्त्वांचा जाहीर लिलाव; सुसंस्कृतपणा, दिलदारी उरलेली नाही! अंबादास दानवे यांचे दिवंगत गोपिनाथ मुंडे यांना भावनिक पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांची आज 12 वी पुण्यतिथी आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांच्या युतीची सत्ता आली तेव्हा गोपिनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहले आहे. या पत्रातून सध्याच्या भाजपवर जोरदार टीका केली आहे.

या पत्रातून त्यांनी युतीतील भाजप व आताचा भाजप यातील फरक दाखवला आहे. तसेच आताचा भाजप कशाप्रकार तत्त्वांना तिलांजली देऊन मित्रपक्षांनाच गिळायला निघाला आहे ते देखील सांगितले आहे. या पत्रातून त्यांनी ”आजचा भाजप पाहिला की मन अस्वस्थ होते. आताच्या भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी जुन्या मित्रांना, ज्यांनी त्यांना बोट धरून महाराष्ट्रात फिरायला शिकवले, त्यांनाच संपवण्याचा विडा उचलला आहे. आजच्या भाजपात सुसंस्कृतपणा, दिलदारी उरलेली नाही त्यांनी तत्त्वांचा जाहीर लिलाव मांडलाय”, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी या पत्रातून भाजपला सुनावले आहे.

अंबादास दानवे यांनी गोपिनाथ मुंडे यांना लिहलेले पत्र –

आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र.

गोपीनाथजी मुंडे साहेब, आज अचानक तुमची खूप आठवण येते. तुम्ही आम्हाला सोडून गेलात, त्याला आता इतकी वर्षे झाली. पण आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा संघर्षाचा, मैत्रीचा आणि शब्दाचा विषय निघतो, तेव्हा तुमची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. आज महाराष्ट्राचे बदललेले राजकारण आणि तुमचा आजचा ‘भारतीय जनता पक्ष’ पाहिला, की मन अस्वस्थ होते. म्हणूनच एका जुन्या, कधीकाळी खांद्याला खांदा लावून लढलेल्या मित्रपक्षाचा सहकारी म्हणून हे अनाहूत पत्र तुम्हाला लिहीत आहे.

तुम्हाला आठवतंय साहेब? आपल्या पक्षांनी एकत्र केलेल्या त्या सभा, तो संघर्ष, आणि ‘युती’चे ते सुवर्णदिवस? तेव्हा राजकारणात मतभेद असायचे, पण मनभेद नसायचे. आज मात्र सगळंच बदललंय. तुमच्या आजच्या भाजपबद्दल मनात काही तीव्र तक्रारी आणि खंत आहेत, त्या आज तुमच्याकडेच मांडतो:

१. मैत्रीची आणि शब्दाची किंमत संपली: गोपीनाथजी मुंडे साहेब, तुम्ही असताना ‘शब्दाला’ किंमत होती. मातोश्रीवर किंवा तुमच्या बैठकीत एकदा जो निर्णय झाला, तो दगडावरची रेघ असायची. पण आजच्या भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी जुन्या मित्रांना, ज्यांनी त्यांना बोट धरून महाराष्ट्रात फिरायला शिकवले, त्यांनाच संपवण्याचा विडा उचलला आहे. राजकारणातली ती जुनी आदराची आणि विश्वासाची संस्कृती या नव्या भाजपने पार मोडीत काढली आहे.

२. सत्तेसाठी कोणतीही तडजोड: तुम्ही विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला सळो की पळो करून सोडले होते. पण आजचा भाजप? सत्तेसाठी ते कोणासोबतही हातमिळवणी करायला तयार आहेत. कालपर्यंत ज्यांच्यावर तुमच्या आणि माझ्या पक्षांनी मिळून भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केले होते, ज्यांच्यावर हे आरोप आपण तेव्हा केले, आज तेच लोक भारतीय जनता पक्षात मानाच्या खुर्च्यांवर बसले आहेत. ज्या तत्त्वांच्या पायावर आपण युती उभी केली होती, त्या तत्त्वांचा आज पक्षात जाहीर लिलाव होत आहे.

३. घरे फोडण्याचे आणि पक्ष पळवण्याचे राजकारण: आमच्या काळात आपण विचारसरणीच्या जोरावर निवडणुका लढायचो आणि जिंकायचो. आजचा भाजप मात्र ईडी, सीबीआय आणि पैशांच्या जोरावर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात, घरे उद्ध्वस्त करण्यात धन्यता मानत आहे. विरोधकांना शत्रू समजून त्यांचा राजकीय गेम करणे, हाच आजच्या भाजपचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. हे तुमचे संस्कार नक्कीच नव्हते.

४. अहंकाराचा अतिरेक: भाजपकडे सत्ता आली तेव्हाही तुमचे पाय कायम जमिनीवर होते. कार्यकर्त्याला आणि मित्रपक्षाच्या नेत्यांना आपण नेहमी सन्मानाने वागवले. पण आजच्या भाजपच्या नेत्यांमध्ये सत्तेचा आणि बहुमताचा प्रचंड अहंकार दिसतो. ‘आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा’ या आविर्भावात आजचा पक्ष चालवला जात आहे. मित्रपक्षांना दुय्यम वागणूक देणे किंवा त्यांना गिळंकृत करणे हीच यांची रणनीती बनली आहे.

गोपीनाथजी मुंडे साहेब, तुम्ही आणि बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून जी युती महाराष्ट्राच्या मनामनात रुजवली होती, ती या नव्या भाजपच्या अहंकाराने आणि चाणक्यनीतीने पद्धतशीरपणे मोडीत काढली.

आज तुम्ही असायला हवे होतात साहेब. तुम्ही असता तर आजच्या भारतीय जनता पक्षाला नक्कीच टोकले असते की, “सत्तेपेक्षा माणसांमधली विश्वासार्हता आणि मैत्री जास्त महत्त्वाची असते.” पण आज तो सुसंस्कृतपणा आणि ती दिलदारी भारतीय जनता पक्षात उरलेली नाही, याची मोठी खंत वाटते.

तुम्हाला भावपूर्ण आदरांजली.

तुमचाच,
एक जुना चाहता आणि राजकीय सहप्रवासी
अंबादास दानवे