हडपसर दारूकांड; पोलिसांसह उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना सहआरोपी करा, शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विषारी दारूमुळे हडपसरमध्ये चार जणांना मृत्यू झाला असून, यामध्ये आणखी काही अत्यावस्थ असल्याची माहिती आहे. विविध ठिकाणी विषारी दारूविक्रीचे राजरोजपणे अड्डे चालत होते. याबाबत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. घटनेत स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे विषारी दारूचे कांड घडले. त्यामुळे संबंधित गुन्ह्यात पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना गुन्ह्यात सहआरोपी करा, अशी मागणी शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन दानवे यांनी घटनेची चर्चा केली. यावेळी आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, शहरप्रमुख कसंत मोरे, माजी आमदार महादेक बाबर उपस्थित होते.

विषारी दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्क, पोलीस अधिकाऱ्यांना फक्त निलंबित करून चालणार नाही. त्यांना सहआरोपी करा, या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री, मुख्य सचिव, संबंधित मंत्र्यांना दोन ते तीन दिवसांत भेटणार आहे. दरम्यान, विषारी दारूकांडात नेमके किती मृत्यू झाले याबाबतीत अनेकांचे रेकॉर्ड नाही. काहींचे पोस्टमॉर्टेम झाले नसून, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले आहेत. त्यांची पोलिसांत तक्रार नसून, हा तांत्रिक मुद्दा आहे. सरकारला याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

तपास सीआयडीकडे देणे म्हणजे पोलिसांचे अपयश

विषारी दारूकांडात झालेल्या मृत्यू प्रकरणाचा तपास गृहखात्याने सीआयडीकडे दिला आहे. हा तपास सीआयडीला द्यावा लागणे म्हणजे, स्थानिक पोलिसांचे अपयश आहे. याचा अर्थ पोलिसांच्या कारवाईवर लोकांचा विश्वास राहिला नाही, असाही आरोप अंबादास दानवे यांनी केला.