
डिंभे धरणातील पाणी कमी झाल्यामुळे उघड्या पडलेल्या जुन्या आंबेगाव गावठाणाने विस्थापित ग्रामस्थांच्या हृदयातील आठवणींचे कप्पे पुन्हा जिवंत केले आहेत. पर्यटकांसाठी हे जरी एक निसर्गरम्य किंवा ऐतिहासिक ठिकाण असले, तरी मूळ रहिवाशांसाठी हा प्रचंड भावूक आणि विरहाच्या सुखाचा क्षण आहे.
डिंभे धरणामुळे गाव सोडताना अनेकांची घरे, अंगण आणि शेती पाण्याखाली गेली. आज जेव्हा पाण्याच्या जागी फक्त कोरडी जमीन व घरांचे दगडी पाया दिसतात, तेव्हा जुनी पिढी तिथे उभी राहून आपल्या मुलांना सांगते, ‘हे बघ, इथे आपलं घर होतं, इथे आपलं अंगण होतं.’ हा आपल्या लहानपणाच्या आठवणींना प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा क्षण त्यांच्या अंगावर काटा आणणारा ठरत आहे.
पाण्याबाहेर आलेले जैन मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर पाहून अनेक वृद्ध ग्रामस्थ नतमस्तक होत आहेत. ज्या मंदिरांमध्ये कधीकाळी सण-उत्सव, कीर्तन, भजने व्हायची आणि संपूर्ण गाव एकत्र यायचा, तिच मंदिरे पुन्हा एकदा गजबजलेली पाहायला मिळत आहेत. गाभारा कोरडा झाल्यामुळे अनेक ग्रामस्थ तिथे मनोभावे पूजा, आरती करताना दिसत आहेत.

जुने आंबेगाव हे त्या काळातील एक मोठी बाजारपेठ अन् मुख्य केंद्र होते. आज धरणाच्या पात्रात उघडे पडलेले जुने रस्ते, विहिरी, तेलाचे घाणे पाहून लोकांना त्यावेळच्या गजबजलेल्या बाजारपेठेची दुकानांची, गल्लीबोळांची आठवण येत आहे. ज्या तरुण पिढीने जुने गाव कधी पाहिलेच नाही. फक्त आई-वडिलांच्या किंवा आजोबांच्या तोंडून गोष्टी ऐकल्या होत्या, ती पिढी आज आपल्या पूर्वजांचे गाव डोळ्यांनी पाहत आहे. एका अर्थाने, या धरणातील पाणी कमी होणे म्हणजे विस्थापित ग्रामस्थांसाठी आपल्या ‘माहेरी’ जाण्यासारखेच आहे. पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या नियमानुसार हे गाव, मंदिरे पुन्हा पाण्याच्या कुशीत विलीन होतील, म्हणूनच तोपर्यंत दररोज शेकडो लोक आपल्या या जिवंत इतिहासाला डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी डिंभे धरणाच्या पात्रात हजेरी लावत आहेत.

धरणग्रस्तांपुढची संकटे कायम
आजही अनेक गावे विस्थापित झाली. त्यांना जमीन, राहायला गावठाणे शासनाने दिली; परंतु आजही या धरणग्रस्तांपुढची संकटे थांबली का? इतरांच्या पाण्यासाठी स्वतःच्या घरादारावर पाणी सोडणाऱ्या या धरणग्रस्तांच्या डोळ्यांत बऱ्याच समस्या आहेत. आंबेगाव व डिंभे धरणातील बुडीत क्षेत्रात गेलेल्या गावांतील लोकांना आज काय मिळाले, हा प्रश्नच गौण आहे. याचे कुणालाही काही देणे-घेणे नाही.





























































