रायगड झेडपी शाळांचे गळके छप्पर, तुटक्या भिंती; हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवघे दोन आठवडे शिल्लक असताना रायगड जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ४७३ जिल्हा परिषद शाळांपैकी ३१५ शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट आहे. गळके छप्पर, तुटक्या भिंती, कुबट वर्गखोल्या असे अनेक गावांतील शाळांचे वास्तव आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुलांसह पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटींचा आराखडा तयार असून निधी मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत शिक्षक आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ९० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३१५ शाळांची दुरवस्था झाली आहे. काही शाळांच्या भिंती तडकल्या आहेत, खिडक्या व पत्रे खराब झाले आहेत. तर काही शाळांच्या इमारती जीर्ण आहेत. या परिस्थितीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती आहे. पालकांमध्येही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. पावसाळ्याच्या काळात जीर्ण इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोकादायक असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पालकांनी केली आहे. दुरवस्था झालेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद सेस फंड तसेच केंद्र सरकारच्या समग्र शिक्षण अभियानाकडे २५ कोटी ८३ लाख रुपयांची मागणी केली आहे. मात्र शिक्षण विभागाला अद्याप निधी प्राप्त झाला नाही.

रोहा, अलिबागमध्ये सर्वाधिक नादुरुस्त शाळा

दुरवस्था झालेल्या ३१५ शाळांपैकी सर्वाधिक शाळा या अलिबाग व रोहा तालुक्यातील आहेत. या दोन तालुक्यांमध्ये प्रत्येकी ३५ शाळांची दुरवस्था झाली आहे. तर कर्जत २४, खालापूर ३८, महाड २४, माणगाव २०, म्हसळा १९, मुरुड २६, पनवेल ८, पेण ३३, पोलादपूर १४, श्रीवर्धन ६, सुधागड १८, तळा ५, उरण १० शाळांची दुरवस्था झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या काही शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. दुरुस्तीसाठी निधी प्राप्त व्हावा यासाठी शिक्षण विभागाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. निधी प्राप्त होताच तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील. – ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी