
उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना बुधवारी काहीसा दिलासा मिळाला. मुंबईतील अनेक भागांमध्ये पहाटे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. मात्र या पावसाने मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल केली. मान्सूनपूर्व पावसानेच अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील नालेसफाईचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसानेच या दाव्याची पोलखोल केली. अंधेरी भागात पडलेल्या रिमझिम पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. सबवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ रस्त्याच्या कडेला काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाच्या पहिल्या सरीतच पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे बीएमसी कर्मचारी आणि पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
मुंबई शहर आणि उपनगरात बुधवार सकाळपासूनच काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. अंधेरी, खार, वांद्रे, बोरिवली, मालाड, गोरेगाव, वर्सोवा, विलेपार्ले आणि जुहू या भागांमध्ये रिमझिम पाऊस पडला. मुंबईसोबतच ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
यलो अलर्ट
मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर आकाश ढगाळ राहील. तसेच गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असल्याने मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल; मान्सूनपूर्व पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली pic.twitter.com/nzSe2Atzn2
— Saamana Online (@SaamanaOnline) June 3, 2026
हीच का मुंबई महापालिकेची नालेसफाई?
मुंबईत मान्सून अजूनही नीट दाखलही झालेला नाही, आणि काही सरी पडताच अंधेरी सबवे पाण्याखाली! हीच का मुंबई महापालिकेची नालेसफाई? कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दावे करणाऱ्या मुंबई महापालिकेची पोलखोल पहिल्याच पावसात झाली आहे. जर एवढ्याशा पावसाने ही अवस्था असेल, तर मुसळधार पावसात मुंबईकरांचे काय होणार? नालेसफाईचे पोकळ दावे आणि प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे, अशी टीका काँग्रेस खासदार वर्षी गायकवाड यांनी एक्सवर पोस्ट करून केली.

मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 2 ते 5 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व वारे वाहणार असून उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील काही ठराविक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण कोकण उपविभागात 3 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर दक्षिण कोकणात 4 आणि 5 जून रोजी अनेक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

































































