
पालिकेकडून 82 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील बहुतांशी नाले अजूनही गाळ-कचऱ्याने तुडुंब भरलेलेच आहेत. विशेष म्हणजे, विरोधकांसह सत्ताधारीदेखील नालेसफाईवर नाराजी व्यक्त करीत आहेत. हीच स्थिती राहिल्यास पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची भीती विरोधकांकडून स्थायी समितीत व्यक्त करण्यात आली.
मुंबईत 82 टक्के नालेसफाईचा दावा खोटा असल्याचे स्थायी समिती सदस्य शिवसेनेच्या श्रद्धा जाधव म्हणाल्या. तर यशोधर फणसे यांनीदेखील उपनगरातील अनेक नाले तुंबलेलेच असल्याचे सांगितले. आतापर्यंत फक्त 20 टक्के गाळ उपसा करण्यात आल्याचा आरोप ‘मनसे’चे यशवंत किल्लेदार यांनी केला. 31 मेपर्यंत 50 टक्के नाल्यातील गाळउपसा होणार असून यंदाच्या पावसाळ्यात मुंबई बुडणार, असा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी केला. सभागृह नेते सत्ताधारी पक्षाचे गणेश खणकर आदींनी नालेसफाईवर टीका केली
सोमवार, मंगळवारी दौरा
नालेसफाईबाबत विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्याच सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे आता 25, 26 जून रोजी स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांचा नालेसफाई दौरा आयोजित करण्यात येईल, असा निर्णय स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केला.
…तर जनतेचा उद्रेक होईल!
दहिसर परिसरात नाल्यातील गाळ उपसा करण्यात आलेला नाही. नालेसफाईच्या कामात ‘हाथ की सफाई’ झाली असून जनतेचा उद्रेक झाला तर प्रशासनाला सामोरं जावं लागेल, असा इशारा प्रकाश दरेकर यांनी दिला. तर झोन 5 मध्ये कंत्राटदार आलाच नाही. झोन सहामधून कंत्राटदार आयात करण्यात आला आल्याचा आरोप करीत नालेसफाईच्या कामावर अंजली नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
पालिकेच्या दाव्यानुसार नालेसफाई
मिठी नदी 56.15 टक्के
छोटे नाले 88.85
मोठे नाले 85.15
एकूण 85.16 टक्के नालेसफाई



























































