बंडोबा की थंडोबा! आज होणार फैसला, महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माघारीची विनवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावत आह्वान उभे केले आहे. महायुतीकडून बंडखोरांची समजूत काढण्यासाठी धावाधाव सुरू असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार, ४ जून हा शेवटचा दिवस असून बंडोबा की थंडोबा याचा फैसला होणार आहे.

यवतमाळमध्ये काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार

यवतमाळमधून साहेबराव कांबळे हे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्यांचा सामना शिंदे गटाच्या दुश्यंत चतुर्वेदी यांच्याशी होणार होता, मात्र ऐनवेळी काँग्रेस उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे. साहेबराव कांबळे यांनी संघटनाबळ जुळत नसल्याने मी माघार घेत असल्याचे कारण पुढे केले आहे. त्यांच्या माघारीनंतर मविआ आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांनी दम भरताच सत्तार बॅकफूटवर

छत्रपती संभाजीनगरमधून भाजपचे सुहास शिरसाट रिंगणात आहेत. मात्र शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुलगा समीर सत्तार याला निवडणुकीत उतरवून बंड पुकारले होते. भाजपवाले आपला पक्ष संपवत असल्याचा आरोपही सत्तार यांनी केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून दम भरताच सत्तार बॅकफूटवर गेले असून त्यांनी उद्या आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेतो असे सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे अर्ज मागे घेत असल्याचा दावा सत्तार यांनी केला असला तरी फडणवीसांच्या एका फोननंतरच ते गर्भगळीत झाले होते असे सांगण्यात येते.