आरबीआयने 12 अब्ज डॉलर्सचे सोने विकले? ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सच्या बातमीने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची परकीय चलन मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या सोन्याच्या साठ्याचा काही भाग विकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणावर आधारित हा दावा ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने केला आहे.

ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अभिषेक गुप्ता यांनी म्हटले आहे की, 22 मेपर्यंतच्या दोन आठवड्यांच्या कालावधीत आरबीआयने सुमारे 12 अब्ज अमेरिकी डॉलर्स मूल्याचे सोने विकले असावे. त्याचवेळी आरबीआयने अंदाजे 7.5 अब्ज डॉलर्सची परकीय चलन मालमत्ता खरेदी केली असण्याची शक्यता आहे.

सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्यात आले असतानाही आरबीआयच्या सोन्याच्या आणि डॉलरमधील मालमत्तेच्या मूल्यामध्ये अपेक्षित वाढ दिसून आली नाही. त्यामुळे आरबीआयने सोने विक्री केली असावी, असा निष्कर्ष गुप्ता यांनी मांडला आहे. या संदर्भात प्रतिक्रिया मागविण्यासाठी पाठविलेल्या ई-मेलला आरबीआयकडून तत्काळ उत्तर मिळाले नाही.

मध्यपूर्वेतील युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील परिणामामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे हिंदुस्थानसमोर भांडवली गुंतवणुकीचा बाहेर जाणारा ओघ आणि वाढलेले तेल आयात बिल यांचा दुहेरी दबाव निर्माण झाला आहे. परिणामी रुपयावर ताण वाढत असून, आरबीआय अधिक तरल परकीय चलन साठा राखण्यास प्राधान्य देत असल्याचे या विश्लेषणातून सूचित होते.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा रुपया स्थिर ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहेत. यामध्ये व्याजदर वाढविणे तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून डॉलर उभारण्याचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार असलेल्या हिंदुस्थानला वाढत्या तेल दरांचा फटका बसत आहे. त्यामुळे परकीय चलन साठ्यावर दबाव वाढला असून सरकारनेही भांडवल बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये इंधन दरवाढ तसेच मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात दुप्पटहून अधिक वाढ यांचा समावेश आहे. रुपयाला आधार देण्यासाठी सरकारकडून आणखी उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभिषेक गुप्ता यांच्या मते, परिस्थिती अनुकूल असेल तेव्हा आरबीआय पुन्हा परकीय चलन साठा वाढविण्याचा प्रयत्न करेल. डॉलर कमकुवत होणे, परदेशी गुंतवणूक वाढणे किंवा तेलाचे दर कमी होणे अशा परिस्थितीत आरबीआयला परकीय चलन मालमत्ता वाढविण्याची संधी मिळू शकते.

मार्चअखेरीस आरबीआयकडे 880.52 मेट्रिक टन सोन्याचा साठा होता. त्यापैकी 77 टक्के सोने देशांतर्गत ठेवण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी हा आकडा 66 टक्के होता. परदेशातील बहुतांश सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांच्याकडे ठेवण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांत आरबीआयने परदेशातील सोन्याचा काही साठा देशात परत आणण्याचे प्रमाण वाढविले आहे. रशियाची मालमत्ता पाश्चात्य देशांनी गोठवल्यानंतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये परदेशात ठेवलेल्या राखीव मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढल्याचे या प्रवृत्तीवरून दिसून येत आहे.