Malviya Nagar Fire – दिल्लीत अग्नितांडव! 21 जणांचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान 10 पोलीस होरपळले, AIIMS मध्ये उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीतील मालवीय नगर भागात बुधवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. येथील हॉटेल फ्लोरिस स्टेला लागलेल्या आगीत आतापर्यंत तब्बल 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अग्नितांडवामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा हादरून गेल्या आहेत. या हॉटेलमध्ये थांबलेले बहुतांश पाहुणे हे शेजारीच असलेल्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक होते. यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, आग आणि धूर एवढा प्रचंड होता की बचावकार्यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या 10 कर्मचाऱ्यांना धुरामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, साकेत येथील मॅक्स रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी 7 ते 8 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन

दिल्ली फायर ऑफिसर रवींदर सिंह यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत धुराच्या विळख्यात सापडली होती. प्राथमिक तपासणीत या हॉटेलमध्ये सुरक्षा नियमांचे आणि बांधकाम नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हॉटेलला केवळ 6 खोल्या बांधण्याची परवानगी असताना. मात्र प्रत्यक्षात तब्बल 18 खोल्यांचे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते. इमारतीमध्ये विजेची वायरिंग उघडी होती, तसेच आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी कोणताही इमर्जन्सी एक्झिट मार्ग उपलब्ध नव्हता. यामुळेच लोकांना बाहेर पडता आले नाही आणि मृतांचा आकडा वाढला.

हॉटेल मालक फरार

दरम्यान, या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कडक पावले उचलत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलचे तीन भागीदार मालक असून या भागात त्यांचे इतरही अनेक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस आहेत. दुर्घटनेनंतर हॉटेल मालक लोकेश बजाज फरार झाला असून त्याच्या अटकेसाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणाच्या बाजूने कसून तपास केला जात आहे.