
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) सध्या इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाची अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. या संदर्भात बोर्डाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक महत्त्वाची पोस्ट शेअर करत नवीन माहिती दिली आहे. आज सकाळी 9.30 वाजेपर्यंत बोर्डाकडे 40 हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या अभिप्रायानुसार त्यांचा डिजिटल अनुभव अधिक सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
अर्ज प्रक्रियेदरम्यान शुल्क भरण्यासाठी बोर्डाने विशेष बँक सुविधांची माहिती देखील दिली आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन पोर्टलवर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन बँक यांचे पेमेंट गेटवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे या विशिष्ट बँकांमध्ये खाते असणे अनिवार्य नाही; ते यापैकी कोणत्याही पेमेंट गेटवेचा वापर करू शकतात. उमेदवार यूपीआय (UPI), नेट बँकिंग आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड यांसारख्या विविध ऑनलाइन पर्यायांचा वापर करून आपले अर्ज शुल्क जमा करू शकतात.
CBSE Verification & Re-evaluation Portal update :
The portal has accepted 4924 applications for verification and
39056 applications for re-evaluation (total of 43980) as of 12 noon today.Our teams remain on constant watch to ensure a secure, reliable and student-friendly…
— CBSE HQ (@cbseindia29) June 3, 2026
या प्रक्रिया दरम्यान पोर्टलवर सायबर हल्ल्याचे अनेक प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. केवळ दोन मिनिटांच्या कालावधीत तब्बल 15 लाख हिट्स आणि 1 लाखापेक्षा जास्त फाईल्स ॲक्सेस करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, सुरक्षा यंत्रणेमुळे ते अपयशी ठरले. यापूर्वी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अंदाजानुसार पुनर्मूल्यांकनासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 20 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी अर्ज करतील. अर्जांची एकूण संख्या किमान 80 हजारांपर्यंत पोहोचू शकते, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार पोर्टल सुरू झाल्याच्या पहिल्या काही तासांतच 16 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते आणि आता हा आकडा 40 हजारांच्या पार गेला आहे.
Payment gateways of SBI, Canara Bank, Bank of Baroda and Indian Bank are available on the Verification and Re-evaluation portal. Students need not have an account with these banks to complete payment but can use any of these payment gateways to make payments.
Candidates may use…
— CBSE HQ (@cbseindia29) June 3, 2026
या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी नेमके कोण अर्ज करू शकते, याबाबतही स्पष्टता देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती आधीच मिळवल्या आहेत, केवळ तेच विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून आपली आवश्यक ओळख पडताळणी पूर्ण करावी आणि संबंधित सेवा निवडावी. त्यानंतर उमेदवारांनी आपल्या विषयाचा अचूक तपशील भरावा. शेवटी विहित शुल्क भरल्यानंतरच ही अर्ज प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.





























































