Ratnagiri News – राजापूरात 45 धोकादायक इमारतींना नोटिस; जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राजापूर नगर परिषद प्रशासनाने धोकादायक व जीर्णावस्थेतील इमारती तसेच जीर्ण वृक्षांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागांतील धोकादायक इमारती आणि अपघातास कारणीभूत ठरू शकणाऱ्या वृक्षांच्या मालकांना नोटिस बजावून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राजापूर शहरातील दाट लोकवस्ती, गजबजलेली बाजारपेठ आणि सार्वजनिक रस्त्यांलगत अनेक जुन्या इमारती आहेत. यापैकी काही इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असून अतिवृष्टी किंवा वादळी वाऱ्यांमुळे त्यांचे भाग कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा इमारतींमधील रहिवासी, पादचारी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

शहरातील तब्बल ४५ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिस बजावण्यात आल्या असून संबंधित इमारतींचे धोकादायक भाग तातडीने काढून टाकणे, आवश्यक दुरुस्ती करणे अथवा इमारतींचा वापर बंद करणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. नोटिसमधील निर्देशांचे पालन न केल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहरातील विविध भागांमध्ये जीर्ण व धोकादायक वृक्षही मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. वादळी वाऱ्यामुळे हे वृक्ष कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत संबंधित वृक्ष मालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आवश्यक ती छाटणी करणे अथवा धोकादायक वृक्ष हटविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राजापूर नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.