
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज यात आणखी एका मोठ्या राजकीय घटनेने भर पडली. तृणमूल काँग्रेसच्या 60 बंडखोर आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर नेते ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले होते. त्यामुळे पक्षात बंडखोरी झाली आहे. ८० आमदारांपैकी साठ आमदारांनी शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यास नकार दिला.
या घडामोडीनंतर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ६० आमदारांनी सभापती रवींद्रनाथ बोस यांची भेट घेतली आणि त्यांना खरा टीएमसी गट म्हणून मान्यता देण्याची व ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्याची विनंती केली. आमदारांचे आवाहन विचारात घेऊन सभापतींनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 200 हून अधिक जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसचा पराभव केला. त्यानंतर टीएमसी आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात दंड थोपटले. त्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याने टीएमसीने दोघांवर निलंबनाची कारवाई केली.
निलंबनाच्या कारवाईनंतर ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांना टीएमसीच्या 80 पैकी 60 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आहे. या आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र विधानसभेचे सभापती रथिंद्र बोस यांना देण्यात आले असून ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. याला पडद्यामागून भाजपची फूस असल्याची चर्चाही बंगालच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.



























































