मेटासोबत रिलायन्सची मोठी भागीदारी; जामनगरमध्ये उभारणार एआय डेटा सेंटर, शेअरमध्ये २ टक्क्यांहून अधिक वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये बुधवारी २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली. सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेटासोबत मोठा करार झाल्याची घोषणा रिलायन्सने केल्यानंतर गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी वाढवली.

या घोषणेनंतर मुंबई शेअर बाजारात (बीएसई) रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २.३९ टक्क्यांनी वधारून १,३०० रुपयांवर पोहोचला. मात्र गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर सुमारे १० टक्क्यांनी घसरला असून मागील सहा महिन्यांत त्यात १७ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरने सुमारे १५ टक्के परतावा दिला असून तीन वर्षांत केवळ २.५२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

जामनगरमध्ये उभारणार १६८ मेगावॅटचे एआय डेटा सेंटर

रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले की, मेटाच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित डेटा सेंटरच्या विकासासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये भागीदारी झाली आहे. या कराराअंतर्गत गुजरातमधील जामनगर येथे १६८ मेगावॅट क्षमतेचे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे.

हे डेटा सेंटर मेटा आपल्या एआय आणि संगणकीय गरजांसाठी भाडेतत्त्वावर वापरणार आहे. हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून भविष्यात त्याचा विस्तार करण्याचीही तरतूद ठेवण्यात आली आहे.

रिलायन्सकडून संपूर्ण सुविधा

या प्रकल्पासाठी रिलायन्सकडून डेटा सेंटरचे डिझाइन, बांधकाम, नवीकरणीय ऊर्जेचा पुरवठा, नेटवर्क कनेक्टिव्हिटी तसेच व्यवस्थापन सेवा अशा सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

या करारामुळे रिलायन्स आणि मेटा यांच्यातील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत झाले आहेत. यापूर्वीही दोन्ही कंपन्यांनी हिंदुस्थान आणि निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी एआय आधारित उपाय विकसित करण्यासाठी संयुक्त व्यवसाय उभारला होता. तसेच २०२० मध्ये मेटाने ५.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ९.९९ टक्के हिस्सा विकत घेतला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे जामनगर हे हायपरस्केल AI Computing महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल. तसेच हिंदुस्थानच्या डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळेल.

रिलायन्सच्या मते, जामनगरचे भौगोलिक स्थान या प्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल आहे. येथे नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता, खारे पाणी गोडे करण्याची सुविधा, पाणबुडी केबल लँडिंग स्टेशनची जवळीक आणि जिओच्या फायबर नेटवर्कद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.

कंपनीने सांगितले की, हे डेटा सेंटर मुख्यतः रिन्युएबल एनर्जीवर चालवले जाईल. तसेच कुलिंग व्यवस्थेसाठी खाऱ्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम डेटा सेंटर उभारण्याचा रिलायन्सचा प्रयत्न असणार आहे.