नोकरीसाठी गेलेले 20 हिंदुस्थानी रशियात अडकले, दीड लाख पगाराचे आमिष, हातात दिले 10 हजार रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिश पॅकिंग आणि टेलरिंगची नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली गुजरातमधून 33 लोकांना रशियाला पाठवले. रशियात नोकरी करण्यासाठी दीड ते दोन लाख पगार मिळेल असे आमिष दाखवले, परंतु रशियात गेल्यानंतर त्यांना केवळ 10 हजार रुपये पगार दिला गेला. फसवणूक झाल्याने या सर्वांना पुन्हा हिंदुस्थानात यायचे आहे, परंतु परत येण्याचा मार्ग खडतर झाला आहे.

आणंद आणि वडोदरा येथील 20 तरुण-तरुणी रशियात अडकले असून या सर्वांची पेटलाद येथील रहिवासी रिम्पल पटेल याने फसवणूक केली आहे. रशियाला घेऊन जाण्याच्या बदल्यात रिम्पल पटेल याने तरुणांकडून 78 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

पासपोर्ट जप्त, 500 डॉलरची मागणी

पीडित व्यक्तींनी सांगितले की, ज्या कंपनीसोबत करार झाला आहे, त्या कंपनीने आमचे पासपोर्ट जप्त केले आहेत. हिंदुस्थानात परत जायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीने 500 डॉलर म्हणजेच जवळपास 48 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. खोलीत बंद केले जाते. बाहेर जाण्यास बंदी आहे. जेवणही दिले जात नाही, असे पीडिताने म्हटले आहे.