
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ऐतिहासिक 100 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार आहे.
हे संमेलन चार दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनाचे संयोजक, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापच्या प्रमुख कार्यकाही डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते.
महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी पुण्यात पार पडली. या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखांना सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी 13 जून रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ आणि लखनसिंह कटरे सहभागी झाले होते.
बैठकीत संमेलनासाठी आवश्यक असलेले भव्य प्रांगण, प्रशस्त पार्किंग, तसेच विद्यापीठातील सुमारे दीड हजार प्राध्यापक व कर्मचारी संमेलनाच्या यशासाठी सहकार्य करतील, अशी ग्वाही कुलगुरू सुरेश गोसवी यांनी दिल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून 100 वे साहित्य संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.




























































