
चार वेळच्या जगज्जेत्या जर्मनीने फिफा वर्ल्ड कपमधील आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात करताना नवोदित कुरासाव संघाची 7-1 गोलफरकाने दाणादाण उडविली. ‘ई’ गटातील या सामन्यात जर्मनीने आक्रमक खेळाचे दर्शन घडवत 2014 नंतर प्रथमच विश्वचषकातील सलामीचा सामना जिंकण्याचा मान मिळवला.
सामन्याच्या सहाव्या मिनिटालाच फेलिक्स नेमेचाने शानदार गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. मात्र, लिव्हानो कोमेनेन्सियाच्या विचलित झालेल्या फटक्यामुळे कुरासाओने बरोबरी साधत चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला. परंतु त्यानंतर जर्मनीने प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी न देता गोलांचा सपाटा लावला.
निको श्लोटरबेक, काई हाव्हर्ट्झ (2), जमाल मुसियाला, नॅथॅनिएल ब्राऊन आणि डेनीझ उंडाव यांनी गोलांची आतषबाजी करत जर्मनीचा विजय एकतर्फी केला. पहिल्या सत्राअखेर जर्मनीने 3-1 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातही त्यांचा दबदबा कायम राहिला.
कुरासाओने काही काळ प्रतिकार केला. मात्र, जर्मनीच्या भेदक आक्रमणासमोर त्यांची बचावफळी अखेर कोसळली. काई हाव्हर्ट्झने केलेल्या दुसऱ्या गोलसह जर्मनीने 7-1 अशी विजयी मोहर उमटवली. विशेष म्हणजे, 2014 च्या उपांत्य फेरीत यजमान ब्राझीलविरुद्ध नोंदवलेल्या 7-1 च्या ऐतिहासिक विजयाचीच पुनरावृत्ती जर्मनीने या सामन्यात केली. या दणदणीत विजयामुळे जर्मनीने बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले असून, आता त्यांच्यासमोर इक्वेडोर आणि आयव्हरी कोस्ट यांचे आव्हान असेल.
बलाढ्य स्पेनला काबो व्हर्डेने झुंजवले
या वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार असलेल्या स्पेनला काबो व्हर्डेसारख्या संघाने पहिल्याच सामन्यात झुंजवले. काबो व्हर्डेने स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही, त्यामुळे हा सामना गोलरहीत बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटला असला तरी हा काबो व्हर्डेसारख्या संघाचा विजय समजला जात आहे, तर स्पेनची हार.
कामादाच्या गोलने जपानला वाचवले!
डॅलस ः डाईची कामादाने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलच्या जोरावर जपानने फुटबॉल वर्ल्ड कपमधील आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. ‘एफ’ गटातील रंगतदार लढतीत जपानने बलाढ्य नेदरलँड्सला 2-2 अशा बरोबरीत रोखत महत्त्वाचा गुण मिळवला.
सामन्याच्या 51व्या मिनिटाला रायन ग्रावेनबर्चच्या अचूक क्रॉसवर नेदरलँड्सचा कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाइकने शानदार हेडर करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सहा मिनिटांनंतर ताकेफुसा कुबोच्या पासवर केईटो नाकामुराने चेंडूवर नियंत्रण मिळवत जोरदार फटका मारला. हा फटका डच बचावपटू जान पॉल व्हॅन हेकेला लागून जाळ्यात गेला आणि जपानने 1-1 अशी बरोबरी साधली.
64व्या मिनिटाला क्रायसेन्सिओ समरव्हिलने गोल केल्यामुळे नेदरलँड्सने पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोकी ओगावा सर्वाधिक उंच उडी घेत हेडर मारला. त्याला डाईची कामादाचा निर्णायक स्पर्श लाभला आणि जपानने 2-2 अशी बरोबरी साधली.




























































