
राज्यात 28 जून 2026 रोजी होणाऱया राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनी 0 ते 5 वर्षे वयोगटातील अंदाजे 1 कोटी 2 लाख 91 हजार 816 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात 89 हजार 489 लसीकरण बूथ, 2 लाख 76 हजार 161 घरभेट पथक दिवस, 26 हजार 530 संक्रमण पथक दिवस, 13 हजार 518 मोबाईल पथक दिवस आणि 586 रात्रीची विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्य लसीकरण कृती दलाच्या बैठकीत देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.




























































