
दीड महिन्यापासून घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात धूळखात पडलेली ठाणेकरांची डबल डेकर अखेर रस्त्यावर धावू लागली आहे. वागळे इस्टेटमधील आयटीआय सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर ही बस धावत असून येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी एक डबल डेकर बस टीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांप्रमाणे ठाणेकरांचाही प्रवास आनंददायी झाला आहे.
मुंबईतील बेस्टप्रमाणे ठाणेकरांनाही डबल डेकर बसचा अनुभव मिळावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी टीएमटीने १० वातानुकूलित डबल डेकर बस खरेदीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आली. मात्र स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने ही डबल डेकर गेले दीड महिना आगारातच उभी होती. महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून लोकार्पण केलेली ही बस धूळखात ठेवली होती. अखेर यावर टीकेचे झोड उठल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली.
एकूण ६५ प्रवाशांची क्षमता
बसचे परिचलन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या बसमध्ये खालच्या मजल्यावर ३६ तर वरच्या मजल्यावर २९ आसने असून एकूण ६५ प्रवाशांची क्षमता आहे. प्रत्येक आसनामागे मोबाईल चार्जिंगची सुविधा देण्यात आली असून बसचालकांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे




























































