
कोसिमशेत अंगणवाडी शाळेची गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल व दुरुस्ती न केल्याने दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या वर्गातील फरशा तुटल्यामुळे विद्यार्थी खड्ड्यात बसून शिक्षण घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वाडा तालुक्यातील कोसिमशेत येथे अंगणवाडी आहे. गावात १०० घरे असून ४५० लोकसंख्या आहे. गावातील ३० मुले या अंगणवाडीत शिकतात. मात्र या अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. वर्ग खोलीची फरशी तुटून एक भलामोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना खड्ड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच अंगणवाडीसाठी आलेला अन्नधान्य साठा ठेवायलाही याठिकाणी सुरक्षित जागा नाही. शाळेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे उंदीर आणि घुशींचा वावर वाढला आहे.
अन्यथा आंदोलन; शिवसेनेचा इशारा
इतकी गंभीर परिस्थिती असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र एकानेही दाद दिली नाही. अखेर शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. प्रशासनाने लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती केली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विभागप्रमुख विलास गिंबल यांनी दिला आहे. तसेच निधीची तरतूद करून लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे ग्रामपंचायत अधिकारी मंदा कोंदारी यांनी सांगितले.



























































