सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर; दरड कोसळल्याने गेझिंग-लेगशिप मार्ग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिक्कीममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम सिक्कीममधील गेझिंग-लेगशिप मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता बंद झाला आहे. प्रशासनाने तातडीने बचाव आणि साफसफाईची कामे सुरू केली असून, नागरिकांना या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, गेझिंग परिसरात गेल्या 24 तासांत 95.2 मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्री उशिरा अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

गेझिंग-लेगशिप रस्ता हा पश्चिम सिक्कीम जिल्ह्याची प्रमुख जीवनवाहिनी मानला जातो. या मार्गाला पर्यायी रस्ता नसल्याने नागरिक, व्यापारी, रुग्णवाहिका आणि अन्य अत्यावश्यक सेवांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेझिंगचे जिल्हाधिकारी तेन्झिंग डेन्झोंगपा यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री सुमारे 9 वाजता दरड कोसळल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. सर्वात मोठी दरड गेझिंग शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ओमचुंग येथील सरकारी शाळेजवळ कोसळली. या भागात यापूर्वीही चिखल आणि माती घसरून रस्त्यावर आल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणात दगड आणि मलबाही रस्त्यावर आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे. दरडीमुळे गेझिंग-लेगशिप मार्गावर चिखल आणि दगडांचा मोठा ढिगारा साचला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

प्रशासनाकडून रस्ता पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत नागरिकांनी प्रभावित भागात जाणे टाळावे, असे आवाहन केले असून हवामान विभागानेही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सिक्कीममधील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.