
देशात आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. रविवारी किंवा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील धर्मेंद्र प्रधान, हरदीप पुरी यांच्यासह किमान दहा ते बारा मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे नाव आघाडीवर आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नुकतीच भेट घेतल्याने केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची जी यादी समोर आली आहे त्यात काही आश्चर्यकारक नावे आहेत. ज्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचेही नाव समाविष्ट आहे. त्याशिवाय अनुराग ठाकूर, अरुण गोविल, ‘आप’मधून भाजपमध्ये आलेले राघव चड्डा, अशोक मित्तल यांच्याशिवाय शिंदे गट आणि तृणमूल कॉँग्रेसमधील बंडखोरांचा केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
नितीशकुमार, अनुराग ठाकूर, अरुण गोविल यांना संधी
बिहारचे माजी मुख्यमंत्री जेडीयू प्रमुख नितीश कुमार, माजी मंत्री अनुराग ठाकूर, मेरठचे खासदार अरुण गोविल, खजुराहोचे खासदार विष्णू दत्त शर्मा, बिहारमधील महाराजगंजचे खासदार जनार्दन सिंग सिग्रीवाल यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय एनडीएला पाठिंबा दिलेले टीएमसीच्या बंडखोर खासदारांपैकी एक किंवा दोन जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते.
पंजाबमधून यांची नावे चर्चेत
पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता आपमधून भाजपमध्ये आलेले राघव चड्डा, अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. तसेच संघाचे प्रचारक राहिलेले राज्यसभा खासदार तरुण चुग यांची नावे केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
या दोघांचा पत्ता आधीच कापला
मोदी सरकारमधील एकमेव ख्रिश्चन मंत्री असलेले जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू हे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून राज्यसभेवर गेले होते. त्यांचा कार्यकाळ संपत आला आला आहे. त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा संधी दिलेली नाही. त्यामुळे या दोघांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून आधीच पत्ता कापला गेला आहे.
प्रतापराव जाधव यांचे आरोग्य खाते काढणार
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडील आरोग्य राज्यमंत्रीपद काढून फक्त आयुष मंत्रालयाचा कारभार कायम ठेवला जाईल. शिंदे गटाकडून नव्याने राज्यमंत्रीपदाची संधी मिळणाऱ्या खासदाराला आरोग्य खाते दिले जाण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांना पॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची चर्चा आहे.
या मंत्रालयांचे कारभारी बदलणार
रेल्वे, अर्थ, ऊर्जा, मनुष्यबळ विकास, वस्त्राsद्योग, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, रसायन व खते, सहकार, मत्स्यव्यवसाय, जलशक्ती, कृषी, पर्यावरण, कायदा आदी मंत्रालयांचे कारभारी बदलण्याची शक्यता आहे.
खट्टर यांच्याकडील ऊर्जा खाते जाणार
केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडील ऊर्जा मंत्रालयाचा कारभार काढून एखाद्या नव्या मंत्र्याकडे ही जबाबदारी दिली जाईल. शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी खट्टर यांच्याकडील कायम राहण्याची शक्यता आहे.
शक्तिकांत दास अर्थ मंत्रालयात
पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात पॅबिनेट मंत्री म्हणून समावेश केला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण खाते
केंद्रीय शिक्षण मंत्रालय दोन वर्षे सातत्याने वादात सापडले असून मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ‘नीट’ पेपरफुटीमुळे मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले असून प्रधान यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून कडक शिस्तीच्या निर्मला सीतारामन यांच्याकडे मनुष्यबळ विकास म्हणजेच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.





























































