Ram Mandi Donation : राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी आरोपींची बाजू कोणताही वकील मांडणार नाही, फैजाबाद बार असोसिएशनचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी प्रकरणी फैजाबाद बार असोसिएशनने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील आरोपींची बाजू कोणताही वकील मांडणार नसल्याचा ठराव असोसिएशनच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. अध्यक्ष कालिका प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना नामनिर्देशित आरोपी केले असून, सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांची कसून चौकशी करत असून, त्यांच्या घरांसह इतर ठिकाणी सातत्याने छापे टाकले जात आहेत. या कारवाईत आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अनुकल्प मिश्रा याच्याकडे मंदिरातील दानपेटीत जमा झालेल्या रकमेची मोजणी करण्याची जबाबदारी होती. पोलिसांच्या मते, अपहाराचा तोच मुख्य सूत्रधार आहे.

  • लवकुश मिश्रा हा अनुकल्प मिश्रा याचा सख्खा मेहुणा आहे.
  • रमाशंकर मिश्रा हे दानरकमेची मोजणी आणि तिचा हिशोब ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक होते.
  • करुणेश पांडे हे देखील दानपेटीतून काढलेल्या रकमेची मोजणी आणि व्यवस्थापनाशी थेट संबंधित होते.
  • सुभाष श्रीवास्तव हे कॅनरा बँकेचे निवृत्त कर्मचारी असून, निवृत्तीनंतर ते राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजाशी जोडले गेले होते.
  • मनीष यादव हा आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू यांचा सख्खा पुतण्या असून, टिन्नू यांनी त्याला सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी दानपेटी व्यवस्थापनाच्या कामावर नियुक्त केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
  • अविनाश शुक्ला हे अयोध्याचे रहिवासी असून, मंदिरातील दानरकमेची मोजणी करणाऱ्या मुख्य पथकाचा भाग होते.

या प्रकरणातील सर्व आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी विशेष तपास पथकाचा तपास वेगाने सुरू आहे.