वरळीच्या धर्तीवर नायगाव, ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांना एकास एक पार्किंग द्या! शिवसेनेने केली विधान परिषदेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींचा पुनर्विकास होत आहे. वरळीच्या धर्तीवर नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडीवासीयांना एकास एक पार्किंग देऊन हजारो रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी बुधवारी शिवसेनेने केली.

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत नियम ९३ अन्वये बीडीडीवासीयांचा पार्किंगचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, वरळी बीडीडीवासीयांना एकास एक पार्किंग दिली आहे. परंतु प्रकल्प एकच असतानादेखील पार्किंगची सुविधा देताना नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांवर अन्याय का, असा सवाल त्यांनी केला. येथील रहिवाशांना स्वतंत्र पार्किंगचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते याची आठवण शिंदे यांनी दिली.

राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, नियमानुसार चार सदनिकांमागे एक पार्किंग देण्याची तरतूद आहे. रहिवाशांची मागणी आणि जागेची उपलब्धता विचारात घेता दोन सदनिकांमागे एक पार्किंग याप्रमाणे तिन्ही बीडीडी चाळींकरिता नियोजन करण्यात आले. वरळी बीडीडी प्रकल्पात पुरेशी जागा असल्याने एकास एक पार्किंग शक्य झाले, परंतु ना. म. जोशी आणि नायगाव येथे पुरेशी जागा नसल्यामुळे दोन सदनिकांमागे एक पार्किंग देण्यात आली. यावर सुनील शिंदे आणि ॲड. अनिल परब यांनी आक्षेप घेत शासनाने ठरवले तर एकास एक पार्किंग देता येऊ शकते, अशी ठाम भूमिका मांडली.

बैठक घेऊन तोडगा काढू बीडीडीवासीयांबाबत शासन सकारात्मक आहे. वरळीत पोडियम पार्किंग तर नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात बेसमेंट पार्किंग देण्यात आले आहे. ही तांत्रिक अडचण असली तरीदेखील यावर पुन्हा एकदा बैठक घेऊन योग्य तोडगा काढू, असे आश्वासन मंत्री पंकज भोयर यांनी दिले.