
लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून देण्यात आलेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. नातवाच्या अकाली निधनाचा धक्का सहन न झाल्याने केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचेही एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या दुहेरी धक्क्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाचे वृत्त दिले.
देवीचंद अग्रवाल यांची काही काळापूर्वी हृदयशस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून त्यांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत होत्या. अशातच तरुण नातवाच्या क्रूर हत्येच्या बातमीने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला होता. या मानसिक धक्क्यामुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावली. या आठवड्याच्या सुरुवातीला अचानक प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
केतन अग्रवाल (वय- 26, रा. पुणे) या तरुण रिअल इस्टेट व्यावसायिकाची त्याची होणारी पत्नी सिया गोयल (वय – 20) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (वय – 22) यांनी लोहगड किल्ल्यावरील खोल दरीत ढकलून हत्या केली होती. या धक्कादायक घटनेला काही आठवडे उलटत नाहीत तोच आजोबांचेही निधन झाले. पोलीस तपासात या हत्येबाबत अत्यंत थरारक आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
गुगल, यूट्यूबवर शोधल्या हत्येच्या पद्धती
पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सिया आणि चेतन यांनी केतनची हत्या करण्यासाठी गुगल आणि यूट्यूबवर वेगवेगळ्या पद्धती शोधल्या होत्या. अनेक सर्च रिझल्ट्सचा अभ्यास केल्यानंतर, केतनला लोहगड किल्ल्यावर फिरायला नेऊन तिथून दरीत ढकलून देणे सर्वात सोपे आणि सुरक्षित राहील, असा निष्कर्ष त्यांनी काढला. गुन्हा करण्यापूर्वी दोघांनी सविस्तर नियोजन केले होते आणि पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक मेसेजही डिलीट केले होते.
केतन अग्रवाल हत्याकांडात बीड कनेक्शन समोर, चेतन चौधरीचा मित्र ताब्यात




























































