
बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणी उत्तर प्रदेश दक्षता पथकाने मोठी कारवाई केली. दक्षता पथकाने माजी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) ललित कुमार यांच्या लखनौ येथील निवासस्थानावर छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालतमत्ता जप्त करण्यात आली. सर्च वॉरंटच्या आधारे पथकाने ७ आणि ८ जुलै रोजी छापेमारी करत १.६२ कोटी रुपये रोख, अंदाजे १३ किलो सोने, ९ किलो चांदी, मौल्यवान हिऱ्यांचे दागिने आणि अनेक शहरांमधील मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. जप्त केलेल्या सोने, चांदी आणि दागिन्यांचे अंदाजित मूल्य सुमारे २० कोटी रुपये आहे.
टीव्ही ९ भारतवर्षने दिलेल्या वृ्तानुसार, माजी एआरटीओ ललित कुमार यांच्या विरोधात २०२४ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत असंभाव्य मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे दक्षता अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवत ललित कुमार यांच्या अलिगंज येथील निवासस्थानी दोन दिवस शोध मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेदरम्यान, दक्षता पथकाने अंदाजे २० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या दागिन्यांचे आणि मौल्यवान धातूंचे वास्तविक मूल्य निश्चित करण्यासाठी त्यांचे सविस्तर मूल्यांकन सुरू आहे. तपासादरम्यान, दक्षता अधिकाऱ्यांनी लखनौ, नोएडा, बाराबंकी आणि रायबरेलीसह विविध ठिकाणी असलेल्या निवासी घरे, भूखंड, शेतजमीन आणि फ्लॅट बुकिंगशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली. प्राथमिक तपासानुसार या स्थावर मालमत्तेचे मूल्य १३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
छापेमारीत बँक खाती, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे देखील जप्त केली आहेत. तसेच एक टोयोटा इनोव्हा आणि एक ह्युंदाई आय२० कार देखील जप्त करण्यात आली. झडतीदरम्यान एक परवानाधारक रिव्हॉल्वर देखील जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली रोकड, दागिने, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रांची सविस्तर तपासणी केली जात आहे.
या मोठ्या मोहिमेच्या यशाबद्दल पोलीस महासंचालक आणि दक्षता संचालकांनी लखनौ सेक्टर दक्षता पथकाला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेली मालमत्ता, गुंतवणूक आणि आर्थिक कागदपत्रांची दक्षता विभागाकडून सखोल चौकशी केली जात आहे.




























































