
मित्रांसोबत खेळत असताना निवासी इमारतीतील लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मुंबईतील कुर्ला परिसरात घडली. नेहरू नगर परिसरातील शमीम टॉवर येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. मोहम्मद झैन जमीर तहसीलदार असे मयत मुलाचे नाव आहे.
एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद झैन जमीर तहसीलदार हा दहाव्या मजल्यावर मित्रांसोबत खेळत असताना लिफ्टच्या बाहेरील दरवाजाला टेकून उभा होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो थेट लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु आहे.
याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लिफ्टची देखभाल किंवा तिच्या संचालनामध्ये काही निष्काळजीपणा झाला होता का, याचीही तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान काही त्रुटी किंवा हलगर्जीपणा आढळून आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.



























































