विमानाच्या सदोष सीटमुळे चक्कर आणि वेदना; ज्येष्ठ नागरिकाला एअर इंडियाकडून 20 लाख रुपयांची भरपाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानातील सदोष बिझनेस क्लास सीटमुळे ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला झालेला त्रास एअर इंडिया विमान कंपनीला चांगलाच महागात पडला. 15 तासांच्या हवाई प्रवासात ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला सदोष सीटमुळे चक्कर तसेच असह्य वेदना होऊ लागल्या. या त्रासापोटी भरपाई म्हणून ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला विमान तिकिटाचा संपूर्ण परतावा आणि 20 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने यासंदर्भात एअर इंडियाला भरपाईचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक न्यायमूर्ती राजेश चंद्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा निर्णय दिला.

इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती चंद्रा आणि त्यांच्या पत्नीने नवी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को व परत येण्याच्या प्रवासासाठी एअर इंडियावर प्रत्येकी 1.8 लाख रुपये देऊन इकॉनॉमी क्लासची तिकिटे बुक केली होती. तथापि, १९७८ पासून असलेल्या सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आणि सायटिकाच्या आजारामुळे त्यांनी प्रत्येकी १.२३ लाख रुपये अतिरिक्त रक्कम भरून दोन्ही तिकिटे इकॉनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला. 22 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान त्यांना एअर इंडियाच्या AI-174 विमानातील बिझनेस क्लासमध्ये सीट क्रमांक 08D देण्यात आला होता. तथापि, ती सीट सदोष आणि मागे न झुकणारी (नॉन-रिक्लायनिंग) असल्याचे निष्पन्न झाले. हे लक्षात येताच त्यांनी लगेचच केबिन क्रूच्या निदर्शनास समस्या आणली, परंतु त्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही संबंधित समस्या सुटली नाही.

अत्यंत अस्वस्थ वाटत असल्याने तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने केबिन क्रूला आपली जागा बदलून पर्यायी जागा देण्याची विनंती केली. मात्र, क्रूने त्याला सांगितले की बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लास या दोन्ही केबिनमध्ये एकही जागा रिकामी नाही. परिणामी, त्याने 15 तासांचा विमानप्रवास अत्यंत त्रासात पूर्ण केला. या त्रासामुळे त्याचे आरोग्य अधिकच खालावले, असाही आरोप आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने तक्रारदार ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला 20 लाख रुपयांची भरपाई मंजूर करीत मोठा दिलासा दिला.