
मुस्लिम तरुणीशी लग्न करण्यासाठी योगेंद्र नावाचा तरुण तब्बल दहा वर्षे अब्दुल रहमान म्हणून राहिला, परंतु पासपोर्टसाठी काढलेल्या 400 रुपयांच्या बनावट पॅनकार्डमुळे त्याचे बिंग फुटले आणि तो चौकशीत पकडला गेला. या तरुणाचे खरे नाव योगेंद्रकुमार रामपुमार मौर्य असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. मुस्लिम महिलेशी लग्न केल्यानंतर या व्यक्तीने स्वतःची ओळख दहा वर्षांपासून लपवून ठेवली होती.
दहा वर्षे वेगळ्या नावाने दुसऱ्या शहरात राहत असताना योगेंद्रकुमार याने विविध सरकारी कागदपत्रे तयार केली होती. त्यामुळे यंत्रणांना धक्का बसला आहे. अहमदाबादच्या गुन्हे शाखेकडून आता या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. 2011 साली या प्रकरणाची सुरुवात झाली. योगेंद्रकुमार हा त्याच्या गावातील एका मुस्लिम महिलेच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांनी गाव सोडून दिल्लीत आर्य समाजाच्या विधीनुसार लग्न केले. यानंतर योगेंद्रपुमार अब्दुल रहमान खान या नावाने वावरत होता.
पासपोर्ट काढताना झाला भंडाफोड
योगेंद्रकुमारने अब्दुल रहमान खान या नावाने पासपोर्ट काढण्याचा अर्ज केला नसता तर त्याची खरी ओळख कधीही उघड झाली नसती. पासपोर्ट पडताळणीदरम्यान अर्जदाराकडे आधीपासूनच लखनऊमधून जारी केलेला पासपोर्ट असल्याचे लक्षात आले. ही विसंगती लक्षात आल्यानंतर अहमदाबादच्या गुन्हे शाखेकडे सदर प्रकरण वर्ग करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की, त्याचे खरे नाव योगेंद्रकुमार मौर्य आहे.

























































