पंढरपूर रेल्वेस्थानक नवरी सारखे नटले, मूलभूत सेवा सुविधांसह प्रशासन वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने पंढरपूरचे रेल्वे स्थानक नव्या नवऱ्यासारखे नटले आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना आवश्यक त्या मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासह स्थानकावर 38 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे स्टेशनचे प्रबंधक के के मिश्रा यांनी दिलीय.

आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असल्याने रेल्वे प्रशासनाने पंढरपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष तयारी केली आहे. नवीन कार्यालयाचे बांधकामही पूर्णत्वास येऊन त्यांचीही रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. भाविक प्रवाशांना आराम करता यावा, यासाठी सुमारे ३,००० चौरस फुटांचा प्रशस्त विश्रांती हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या हाॅलमध्ये बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा, तसेच अन्य आवश्यक मूलभूत सोयी उपलब्ध केल्या आहेत. रेल्वेस्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील कार्यालयामध्ये नव्याने ३८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय केली आहे. वारीच्या काळात रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रवाशांना प्रतीक्षेच्या वेळेत आरामदायी वातावरण मिळावे, हा या सुविधेमागील उद्देश आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांसह प्रवास करणारे भाविक यांना या हॉलचा मोठा लाभ होणार आहे.

याशिवाय, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर रेल्वेस्थानकाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामेही वेगाने सुरू आहेत. स्थानकाच्या इमारतीला आकर्षक रंगसंगती देऊन परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि स्वागतशील बनविण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांचे प्रथम दर्शनच आकर्षक रेल्वेस्थानकातून होणार असून, स्थानकाच्या सौंदर्यातही लक्षणीय भर पडणार आहे. वारकऱ्यांचा सुरक्षित, स्वच्छ आणि सुखकर प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असून, ही तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

आकर्षक सजावट

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर रेल्वेस्टेशनच्या प्रथमदर्शनी कार्यालयपासून संपूर्ण इमारतीचे रंगरंगोटी पूर्णत्वास येत आहे. प्रवाशांना पंढरीत येताच रेल्वेस्टेशन बघून उत्साह व आनंद वाटावा, यादृष्टीने रेल्वेची रंगरंगोटी करण्यात येत आहे. – के. के. मिश्रा, प्रबंधक, पंढरपूर रेल्वेस्टेशन