दहशतवादाचे धडे देणारी 144 पुस्तके, मासिके जप्त; राज्याच्या गृहखात्याची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करणारी आणि पेट्रोल बॉम्ब, सुसाईड रॉकेटपासून ते पॉयजन बनवण्याचे धडे देणारी 144 हून अधिक पुस्तके, मासिके आणि डिजिटल साहित्य राज्यभरातून जप्त करण्यात आले आहे. राज्याच्या गृह खात्याने ही कारवाई केली आहे. अल कायदा, आयसिस, हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांचा या साहित्याशी थेट संबंध असून त्या माध्यमातून मोठा कट आखला जात असावा असा संशय आहे. जप्तीच्या कारवाईनंतर आता हे साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था सरकारच्या रडारवर आल्या आहेत.

राज्याच्या गृह खात्याने कट्टरतावादी मासिके, पुस्तके व विखारी साहित्य जप्त करण्याची अधिसूचना काढली आहे. विविध डिजिटल माध्यमांवर कट्टरतावादी साहित्याचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएएस), मुंबई पोलिसांचा गुप्तचर  विभाग, सायबर सेलला आढळून आले आहे. या साहित्याद्वारे हिंसक अतिरेकी विचारसरणीचे उदात्तीकरण, युवकांचे ब्रेनवॉश आणि देशाच्या सार्वभौमत्व व अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे गृह खात्याने म्हटले आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी ही कारवाई करणे आवश्यक होते असे अधिसूचनेत करण्यात आले आहे.

आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये व्हॉइस ऑफ खुरासन या मासिकाचे अनेक अंक, द रेव्हल्युशनरी रिसर्जन्स, कश्मीर किफा, रेझिलन्स अँड करेज, द सोल ऑफ रेजिस्टन्स, नवाई गाझवा ए हिंद, अल नबा तसेच इतर कट्टरतवादी पुस्तके आणि प्रचार साहित्याचा समावेश आहे. हे साहित्य अल अझैम मीडिया, अस सहाब, अल बसिर मिडिया, अल तहिर मीडिया, ग्लोबल इस्लामिक मीडिया फ्रंट, अल कतैब अशा प्रकाशनामार्फत प्रसारित करण्यात येत होते.

हादरवून टाकणारे साहित्य

पेट्रोल बॉम्ब मॅन्युअल, दी लिटील मुजाहिदीन, द मुजाहिदीन पॉयझन हँडबुक, एक्सप्लोझिव्ह बेसिक, रिक्युरिटी अँड इंटेलिजन्स कोर्स बाय अबू अब्दुल्ला बीन आदम, केमिकल एक्सप्लोझिव्ह बेस्ड ऑन हायड्रोजन पेरॉक्साइड, हाऊ टू स्टे अॅनॉनीमस.