
दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन भागात पाच मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दुर्घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. “दिल्लीत केंद्र, महापालिका आणि प्रशासकीय व्यवस्थेचे ट्रिपल इंजिन सरकार असताना प्रशासन नेमके कशासाठी लाचार आहे? ही लाचारी प्रशासकीय नसून सरकारच्या हेतू आणि संवेदनशीलतेची आहे,” अशी टीका त्यांनी केली.
या दुर्घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य आधीच संघर्षाने भरलेले असते, पण आता ते जीवघेणे ठरत आहे. चांगल्या वसतिगृहांची पुरेशी सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच छताखाली चाळीस-चाळीसच्या संख्येने अमानुष आणि असुरक्षित परिस्थितीत राहावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा जीव अत्यंत मौल्यवान असून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीत सातत्याने घडणाऱ्या अशा दुर्घटनांवर ताशेरे ओढत राहुल गांधी यांनी सरकारला निष्काळजीपणाच्या झोपेतून जागे होण्याचे आवाहन केले. केवळ दुर्घटना घडल्यानंतर नोटिसा बजावणे आणि वरवरची कारवाई करण्यापेक्षा, बेकायदेशीर बांधकामे आणि भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


























































