सरकार गणेशोत्सव मंडळांशी चर्चा का करत नाही? उद्धव ठाकरे यांचा सवाल; लोकांना उत्सव पाहिजे मात्र त्यातून निर्माण होणारा जाच नको!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे बंदीवरून सुरू असलेल्या वादावर महायुती सरकारवर निशाणा साधला. लोकमान्यांनी सणांची एक चळवळ केली. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. साहजिकच आहे चळवळीचं रुपांतर उत्सवात झालं. पण उत्सावचं रुपांतर आता गोंगाटात होता कामा नये. जनतेच्या आनंदासाठी उत्सव असावेत. त्रास देण्यासाठी नसावेत. मुळामध्ये लोकांना उत्सव पाहिजे. पण त्याच्यातून होणारा जाच नकोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आधी गणेशोत्सव मंडळांशी चर्चा का करत नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला.

सणाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. शेवटी सणाचं पावित्र्य म्हटल्यानंतर सणात गोंगाट असणं काही गरजेचं नाही. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अधिकाधिक जनतेने सहभागी व्हावं, या उद्देशाने लोकमान्यांनी घरातला गणपती हा सार्वजनिक ठिकाणी आणला, असं म्हणतात. थोडक्यात लोकमान्यांनी सणांची एक चळवळ केली. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. साहजिकच आहे चळवळीचं रुपांतर उत्सवात झालं. पण उत्सावचं रुपांतर आता गोंगाटात होता कामा नये. आणि काही वर्षांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत रोंबासोंबा नावाचा अत्यंत हिणकस असा नृत्य प्रकार सुरू झाला होता. सुदैवाने जनतेलाच ते कळलं आणि तो प्रकार बंद झाला. आता सुद्धा नुसतं दणदणाट करणं यापेक्षा किती छान आपण आरती म्हणतो, झांज आणि घंटा वाजतो तो मंदिरामध्ये छान वाटतो. पण जनतेच्या आनंदासाठी उत्सव असावेत. त्रास देण्यासाठी नसावेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातंपण आहे. आता ही डीजे बंदी कोणत्या आयुक्तांच्या अखत्यारीत येते? महापालिका की पोलीस? तर त्या नागपूर, पुणे आणि पनवेल आयुक्तांची बैठक घेऊन त्यांच्यात एकवाक्यता करा. चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही कोणाशी चर्चा करत आहात? कोणाशीच तुम्ही चर्चा करत नाहीयेत. जो काही प्रश्न उठवतोय त्याला तुम्ही रात्री एक दीड वाजता उचलून आत टाकताय, का चर्चा केली नाही त्याच्याशी? संतोष पंडित हा एक विषय आहे. विद्यानंद बापट हा दुसरा विषय आहे. या सगळ्यांशी तुम्ही चर्चा का करत नाही? चर्चा करा ना. ते बरोबर का तुम्ही बरोबर? ठरवा चर्चेतून. मुळामध्ये लोकांना उत्सव पाहिजे पण त्याच्यातून होणारा जाच नकोय, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला सुनावले.

प्रत्येक ठिकाणी डेसिबल मोजलं जातं. त्या डेसिबलप्रमाणे तुमचे कायदे कोण पाळणार? त्याची अंमलबजावणी कोण करणार? त्याच्यासाठी बापट किंवा इतरांशी चर्चा करण्याच्या आधी गणेशोत्सव मंडळांशी का चर्चा करत नाही? पूर्वी मी स्वतः मुंबईतल्या सर्व गणेशोत्सव मंडळांची रंगशारदामध्ये एक बैठक घ्यायचो. आणि त्याच्यातून माझा प्रयत्न असा असायचा की, जनतेला काहीतरी समाज शिक्षण… तेव्हा डेंग्यू आणि मलेरियाचा प्रदुर्भाव होता. आणि मी आवाहन केल्यानंतर बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या देखाव्यांमधून त्या सर्व गोष्टी मांडल्या होत्या. त्यांच्याशी तुम्ही नीट चर्चा केलीत तर या गोष्टी टोकाला जाण्याची गरज लागत नाही. तुम्ही गणेशोत्सव मंडळाशी बोला, त्यांना नीट सांगा. वेळेची कालमर्यादा ठरवा, त्यांना तुम्ही सांगा की प्रत्येक वेळेला एवढे स्पिकर कशाला लावताय? आणि छान आपली पारंपरिक वाद्य असताना अशा सणाच्या वेळेला डीजेची गरज आहे का? गणेशोत्सव मंडळांना बोलवा ना? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले.

या सगळ्याला हिंदुत्व तुम्ही मानायला तयार आहात का? आणि जे नवहिंदुत्ववादी आहेत, गोमुत्रधारी हिंदुंना हे प्रकार मान्य आहेत का? कारण दहीहंडीचा एक छान सण असतो, त्यासाठी तुम्हाला हे नृत्य कशाला लागतात? हे सगळे नवहिंदुत्ववादी आहेत त्यांच्या हिंदुत्वात ते बसतं का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवातील अश्लिल नृत्यावरून सत्ताधारी राजकीय पक्षांना लगावला.