
मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल गाड्यांना दररोज तब्बल २० ते ५० मिनिटे उशीर होत असल्याने मंगळवारी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. कल्याणहून सुटलेली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) तासभरापेक्षा अधिक काळ उशिराने पोहोचली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी लोकलशेजारीच गोंधळ घातला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तरीही याचा लोकल सेवेवर परिणाम झाला. दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर गेल्या काही महिन्यांत एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे साध्या लोकलच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे. कल्याण, टिटवाळा, कर्जत, कसारा येथून येणाऱ्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर २० ते ५० मिनिटे उशिराने पोहोचत आहेत. गर्दीच्या वेळेत (पीक अव्हर्समध्ये) लोकल सेवेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप नोकरदारांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांनी सीएसएमटी स्थानकात उतरताच मोटरमनची केबिन गाठली आणि आपला संताप व्यक्त केला. ‘प्रशासनाने आमच्या संयमाचा अंत पाहू नये’, असा इशारा काही प्रवाशांनी दिला. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळामुळे डाऊन दिशेने जाणारी लोकल सीएसएमटीहून उशिराने रवाना झाली. विशेष म्हणजे, प्रवाशांच्या या गोंधळानंतरही संपूर्ण दिवसभरात अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेलेच होते.
संतप्त प्रवाशांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
मध्य रेल्वेच्या लोकल नेहमीच उशिराने धावत आहेत आणि यामुळे लाखो प्रवासी त्रस्त आहेत, ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवताना साध्या लोकल बंद करण्यात आल्या आहेत. एक्स्प्रेस गाड्या आणि एसी लोकलच्या फेऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरवताना साध्या लोकलच्या वेळापत्रकाचे तीन-तेरा वाजले आहेत. त्यामुळे प्रशासनाने साध्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक सुधारावे, अशी मागणी प्रवाशांनी केली.
























































