मॅनेजमेंट कोट्यातील अतिरिक्त शुल्कवसुली तातडीने बंद करा; शिवसेनेची उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्कापेक्षा दुप्पट-तिप्पट अतिरिक्त शुल्क वसूल करत आहेत. याप्रकरणी शिवसेनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक दिली. महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नोटिसीचा गैरफायदा घेऊन विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शुल्काचा आर्थिक बोजा लादत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यावर तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

विद्यार्थ्यांची समस्या मांडण्यासाठी शिवसेना नेते, सचिव व खासदार अनिल देसाई यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नोटिसीचा गैरफायदा घेऊन महाविद्यालये प्रथम वर्षाप्रमाणेच दुसऱ्या वर्षातही विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शुल्काचा आर्थिक बोजा लादत असल्याची बाब त्यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, परम यादव, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे उपस्थित होते. या प्रश्नांबाबत तातडीने बैठक बोलावली जाईल आणि पुढील वर्षापासून या कोट्यातील प्रवेशही ‘कॅप’ (CAP) फेऱ्यांनुसारच करून नियमित शुल्क आकारण्याबाबत शासन निर्णय जारी करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.