
‘आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे व ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत असलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे; अन्यथा शासकीय व प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’ असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी दिला.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव मंगल कार्यालय येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठत नागरिक, तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सुदर्शन म्हणाले, ‘सण-उत्सव हे सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि धार्मिक सलोखा वाढवणारे असतात. त्यामुळे उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची प्रत्येक मंडळाने आणि नागरिकांनी काळजी घ्यावी. उत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, वाद किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील संवेदनशील ठिकाणे, मिरवणुकीचे मार्ग, ध्वनिप्रदूषण, वाहतूककोंडी, तसेच रात्रीच्या वेळी होणाऱया गैरप्रकारांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. उत्सवकाळात अफवा पसरवणाऱयांवरही कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, तालुका ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्यासह ‘महावितरण’चे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
























































