परीक्षण – दृश्यविश्वाचा दस्तऐवज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. राजेंद्र बगाटे

छायाचित्रण किंवा फोटोग्राफी हे क्षेत्र बहुतांश काळासाठी पुरुषप्रधान चौकटीतच अडकलेले राहिल्याचे दिसून येते. अवजड कॅमेरे, तांत्रिक मत्तेदारी, अनिश्चित कामाच्या वेळा, प्रवासाची आव्हाने आणि सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न यांमुळे महिलांसाठी हे क्षेत्र दीर्घकाळ अत्यंत दुरापास्त मानले गेले. अशा प्रतिकूल परिघात कॅमेऱयाच्या लेन्समागून जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणाऱया महिला छायाचित्रकारांच्या योगदानाची नोंद मराठी इतिहासलेखनात तुलनेने दुर्मिळच राहिली आहे. ‘कॅमेऱयामागची ती’ हे पुस्तक हीच दरी सांधणारे आहे.

एकूण 40 प्रकरणांमध्ये रचलेल्या या ग्रंथाची विभागणी प्रामुख्याने दोन भागांत केली आहे. पहिला भाग महाराष्ट्रातील पहिल्या पिढीपासून ते आजच्या काळातील महिला फोटोग्राफर्सच्या वाटचालीवर केंद्रित आहे, तर दुसऱया भागात महाराष्ट्राबाहेरील, भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱया जगप्रसिद्ध महिला छायाचित्रकारांच्या कारकीर्दीचा वेध घेण्यात आला आहे. डॉ. अंजली ढमाळ यांची प्रस्तावना आणि सुप्रसिद्ध छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांचे मनोगत यांमुळे या ग्रंथाचे मूल्य द्विगुणित झाले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालमध्ये स्त्राr-मुक्तीच्या चळवळी सुरू असताना छायाचित्रण क्षेत्रात महिलांचा झालेला प्रवेश हा क्रांतिकारी होता. लेखकाने श्रीमती ई. मेयर, मनमोहिनी, ज्ञानदानंदिनी देवी, सरोजिनी घोष आणि अन्नपूर्णा दत्त यांच्यासारख्या पूर्वसुरींचा संदर्भ देत महिलांनी फोटोग्राफीत टाकलेल्या पहिल्या पावलांची आठवण करून दिली आहे. विशेषत अन्नपूर्णा दत्त यांनी स्वतचा होम स्टुडिओ सुरू करून आणि कोलकात्यातील महिला छायाचित्रकारांची संस्था उभारून दिलेला लढा हा केवळ कलेचा प्रवास नसून स्त्राr-स्वातंत्र्याचे आणि आर्थिक स्वावलंबनाचे एक अनोखे प्रतीक होता.

महाराष्ट्रातील महिला छायाचित्रकारांवर आधारित पहिल्या भागात लेखकाने अतिशय बारकाईने संशोधन केले आहे. सामाजिक व विकासविषयक प्रश्नांना आपल्या लेन्सद्वारे वाचा फोडणाऱया संगीता महाजन, स्त्राr-चळवळीच्या संघर्षाचे आणि डॉक्युमेंटरी फोटोग्राफीचे महत्त्व समजून ते छायाचित्रांत उतरवणाऱया विद्या कुलकर्णी, त्याचप्रमाणे लघुपट निर्मिती आणि कलात्मक छायाचित्रणात स्वतचा ठसा उमटवणाऱया प्रियांका सातपुते आणि मराठवाडय़ाच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट म्हणून कठीण वातावरणात काम करणाऱया नीलिमा पाका-टाक यांच्या संघर्षाचे वर्णन वाचकाला अंतर्मुख करते. व्यावसायिक स्टुडिओ व वेडिंग फोटोग्राफीमध्ये ठसा उमटवणाऱया देवळाणकर भगिनींच्या योगदानाला दिलेला उजाळा महत्त्वाचा आहे. याशिवाय साक्षी साळी-पाटील, स्नेहल महाले, ईशा मोहिनी अजित, सीमा जोशी, अमृषा अत्रे, सेजल चौकवाले, प्रतिभा औंधकर, पद्मावती वेल्हाळ, अनघा जांभुळकर, अनुश्री फडणवीस, आभा चौबळ, शीतल विसपुते, सोनाली जोशी, स्वाती खेकाळे, गायत्री हसबनीस-पिंपळे, अवंती कंसारा-तांबट आणि प्राजक्ता इखणकर अशा अनेक समकालीन महिला फोटोग्राफर्सच्या वाटचालीचा समावेश या पुस्तकात आहे. या ग्रंथाचे एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि संवेदनशील दालन म्हणजे भारतातील पहिली पारलिंगी फोटोग्राफर झोया थॉमस लोबो यांच्यावरील प्रकरण होय. समाजात उपेक्षित राहिलेल्या तृतीयपंथी समुदायातून येऊन बिकट आर्थिक परिस्थितीत आणि सामाजिक अवहेलनेचा सामना करत वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून ओळख मिळवणे ही घटना ऐतिहासिक आहे. झोया लोबो यांनी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये भीक मागण्यापासून ते वृत्तपत्रांसाठी महत्त्वाची छायाचित्रे टिपण्यापर्यंत केलेला प्रवास अत्यंत भावूक आणि तितकाच प्रेरणादायी आहे.

ग्रंथाच्या दुसऱया भागात भारतातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज महिला छायाचित्रकारांच्या कारकीर्दीचा मागोवा घेतला गेला आहे. यात भारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट होमी व्यारावाला यांच्याविषयीचे लेखन अत्यंत समृद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्यासारख्या उत्तुंग नेत्यांची दुर्मिळ छायाचित्रे आपल्या कॅमेऱयात कैद करणाऱया होमी व्यारावाला यांनी पुरुषांच्या अफाट गर्दीत साडी नेसून आणि अवजड कॅमेरा पाठीवर वाहून जे काम केले, ते अद्भुत होते. तसेच वाईल्डलाईफ फोटोग्राफीत जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या ऐश्वर्या श्रीधर यांच्या आंतरराष्ट्रीय यशाचा आढावा यात घेतला आहे. यासोबतच रतिका रामास्वामी, दयानिता सिंह, केतकी सेठ, अवनी राय, पौलोमी बसू आणि गौरी गिल यांच्या कार्याचे सखोल विश्लेषण या भागात वाचायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणमधील सामाजिक संघर्षाचे चित्रण करणाऱया फरो अलाई यांच्यासारख्या महिला फोटोग्राफरचा समावेश करून कॅमेरा हे मानवी हक्कांच्या रक्षणाचे हत्यार कसे बनू शकते, हे दाखवून दिले आहे.

‘कॅमेऱयामागची ती’ या पुस्तकाचे सर्वात मोठे यश म्हणजे पुस्तकात मांडण्यात आलेला ‘स्त्राr-दृष्टिकोन’ होय. जेव्हा एखादी स्त्राr कॅमेऱयाच्या मागून जगाकडे पाहते, तेव्हा तिच्या नजरेत अधिक संवेदनशीलता, सूक्ष्मता आणि सामाजिक जाणीव दिसून येते. मग ती युद्धातील महिलांची व्यथा असो, बाळंतपणाची वेदना असो, पाण्यासाठी होणारी पायपीट असो किंवा निसर्गाचा क्षय असो; स्त्राr-छायाचित्रकार या विषयांकडे अत्यंत आत्मीयतेने पाहतात. लेखकाने महिलांच्या छायाचित्रांमध्ये केवळ दृश्यसौंदर्य नसून त्यात एक सामाजिक आणि भावनिक खोली असते, हे सुंदरपणे पटवून दिले आहे.

कॅमेऱयामागची ‘ती’

n लेखक ः डॉ. प्रवीण घोडेस्वार

n प्रकाशक  ः भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

n पृष्ठे ः 168  n मूल्य ः रु. 350/-