
बिहारच्या जमुई सदर रुग्णालयातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे शुक्रवारी रात्री वीज गेल्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये अंधार झाला, त्यानंतर डॉक्टरांना तब्बल 45 मिनिटे मोबाईल फ्लॅशलाईट आणि टॉर्चच्या उजेडात दोन गर्भवती महिलांची शस्त्रक्रिया करावी लागली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पूजा कुमारी आणि अंजनी कुमारी अशी या दोन्ही गरोदर महिलांची नावे असून, त्यांच्या प्रसूतीसाठी ऑपरेशन सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाला. रुग्णालयाचा आपत्कालीन जनरेटर वेळवर सुरू न झाल्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते, परंतु रुग्णांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी वैद्यकीय पथकाने मोबाईल टॉर्चच्या उजेडातच शस्त्रक्रिया पूर्ण केली.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नर्स मोबाईलचा धरून उभी असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. डॉक्टर शालिनी कुमारी, डॉ. रघुनंदन आणि ओटी असिस्टंट अमित कुमार यांनी या गंभीर प्रकारची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांना दिली आहे, तसेच अशा प्रकारच्या घटना येथे वारंवार घडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
दुसरीकडे, या प्रकरणावरून रुग्णालयाची पोलखोल झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापक रमेश पांडे यांनी असे कोणतेही प्रकार घडल्याचे सरळ फेटाळून लावले, मात्र जमुई रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर कुमार यांनी या घटनेची माहिती मिळताच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे.























































