आयफोनसाठी हिंदुस्थानींची दुबईकडे धाव; फोन स्वस्त की ट्रिप महाग?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदी करण्यासाठी काही हिंदुस्थानी ग्राहक थेट दुबईची वाट धरत आहेत. हिंदुस्थान आणि यूएईमधील आयफोनच्या किमतीत मोठी तफावत असल्याने हा पर्याय ग्राहकांना आकर्षक वाटत आहे. मात्र, दुबईला जाऊन फोन खरेदी करणे प्रत्यक्षात किती फायदेशीर आहे, यासाठी प्रवास आणि कस्टम्सचा खर्चही विचारात घेणे आवश्यक आहे. यूएईमध्ये iPhone 18 Pro (256GB)ची सुरुवातीची किंमत 5,099 दिरहम, म्हणजेच अंदाजे 1.32 ते 1.33 लाख रुपये आहे. हिंदुस्थानात याच मॉडेलची सुरुवातीची किंमत 1,64,900 रुपये आहे. त्यामुळे फोनच्या किमतीतच सुमारे 33 हजार रुपयांचा फरक आहे.

तर iPhone 18 Pro Max (256GB)ची यूएईतील किंमत 5,499 दिरहम, म्हणजे अंदाजे 1.42 ते 1.44 लाख रुपये आहे. हिंदुस्थानात या फोनची सुरुवातीची किंमत 1,79,900 रुपये असून, दोन्ही किमतींमध्ये सुमारे 38 हजार रुपयांची तफावत आहे. यूएईमध्ये 5 टक्के VAT लागू आहे, तर हिंदुस्थानातील कर आणि आयात शुल्काच्या रचनेमुळे स्मार्टफोनच्या अंतिम किमतीवर परिणाम होतो.

मात्र, केवळ एका फोनसाठी दुबईला जाणाऱ्यांनी विमानभाडे, व्हिसा, हॉटेल आणि कस्टम्सचे नियम यांचा संपूर्ण हिशोब करणे गरजेचे आहे. आधीच दुबईला जाणार असलेल्या व्यक्तीसाठी मात्र हा पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो.