
‘आयुष्यात स्वतःचे घर असावे,’ हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न असते. पूर्वी वयाच्या 35 किंवा 40 शीतल्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर लोक घर खरेदीचा विचार करत असत, मात्र आता हिंदुस्थानातील तरुण पिढी म्हणजेच ‘जेन झी’ (Gen Z) या जुन्या समजुतीला मोठा छेद देत अगदी कमी वयातच घरमालक बनण्याचे धाडसी आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत आहे.
कोटक महिंद्रा बँकेच्या आकडेवारीनुसार, घर खरेदीच्या या बदलत्या प्रवाहात थक्क करणारी वाढ दिसून आली आहे. 2024 ते 2026 या दोन वर्षांच्या कालावधीत 25 ते 30 वयोगटातील होम लोन (गृहकर्ज) ग्राहकांची संख्या तब्बल 1234 वरून थेट 2290 वर पोहोचली आहे. म्हणजेच या वयोगटातील कर्जदारांची संख्या तब्बल 86 टक्क्यांनी वाढली असून, बँकेच्या एकूण होम लोन पोर्टफोलियोमध्ये ‘जेन झी’ची भागीदारी 6टक्क्यांवरून थेट 9 टक्क्यांवर पोहोचली आहे. ‘आज तक’ने हे वृत्त दिले आहे.
या वेगाने बदलणाऱ्या मानसिकतेमागे तरुणांचे वाढलेले उत्पन्न, करिअरमधील जलद प्रगती आणि संयुक्त उत्पन्नाचा (Dual Income) आधार घेणारे तरुण जोडपे ही मुख्य कारणे आहेत. कोविडच्या महामारीनंतर घराची व्याख्याच बदलली असून, आता घर केवळ राहण्याची जागा राहिलेली नाही तर ती भविष्याची सुरक्षा आणि गुंतवणुकीचे उत्तम साधन बनली आहे. भाड्याच्या घरात आयुष्य काढण्यापेक्षा भविष्यातील आर्थिक स्थैर्याचा पाया भक्कम करण्यावर तरुणांचा अधिक भर आहे.
विशेष म्हणजे, आजचा तरुण वर्ग परिपूर्ण मोठ्या घरासाठी किंवा वयोमर्यादेची वाट पाहत वेळ वाया घालवत नाही, तर आपल्या बजेटनुसार मिळणाऱ्या पहिल्या घरालाच आयुष्याची महत्त्वाची पायरी मानत आहे. वयाच्या तिशीपूर्वीच घर खरेदी करण्याकडे आताच्या जेन झी पिढीचा कल आहे.































































