
हरयाणातील झज्जर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार मैनपाल ढिल्ला याला त्याच्या कंबोडियन प्रेयसीशी लग्न करण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. लग्नासाठी त्याला सकाळी ८ ते रात्री ८ अशी अवघ्या १२ तासांची ‘कस्टडी पॅरोल’ देण्यात आली आहे. झज्जरमधील बादली येथील रहिवासी असलेल्या ढिल्ला याला गेल्या वर्षी कंबोडियातून हिंदुस्थानातून प्रत्यार्पण करून आणण्यात आले होते.
तुरुंगाजवळ असलेल्या एका फार्महाऊसवर हा विवाह सोहळा पार पडणार असून लग्नाचे विधी पूर्ण होताच पोलीस त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन जातील. या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगण्याचे कारण म्हणजे त्याची होणारी पत्नी ‘मेटा चान’ ही कंबोडियाची नागरिक आहे. यापूर्वी पॅरोलवर बाहेर असताना फरार होऊन कंबोडियाला पळून गेल्यानंतर ढिल्लाची तिची ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह-इनमध्ये एकत्र राहू लागले आणि त्यांना चार मुले झाली. या विवाहासाठी मेटा चान तिच्या तीन मुलांसह हिंदुस्थानात दाखल झाली असून चौथे मूल कंबोडियातच आहे.
मैनपाल ढिल्ला याच्यावर हत्येसह तब्बल २२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २००७ आणि २०१० मधील तीन प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर तो हिस्सार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तुरुंगात असतानाही एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जुलै २०१८ मध्ये त्याला ६ आठवड्यांचा पॅरोल मिळाला होता, मात्र त्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यात तो ‘सोनू कुमार’ या बनावट नावाने पासपोर्ट तयार करून देशाबाहेर पसार झाला. कंबोडियात जाऊन त्याने आपली ओळख बदलली आणि तिथे तो व्यवसाय करू लागला. तपास यंत्रणांना तो कंबोडियात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, हरयाणा पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयने (CBI) नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. कंबोडियाच्या प्रशासनाच्या मदतीने जुलै २०२५ मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्यात आले.



























































