मला एक खून माफ असता तर ज्ञानेश कुमार यांना गोळीच घातली असती; VIP प्रमुख मुकेश सहनी यांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी तीव्र होत असतानाच बिहारमधील विकासशील इन्सान पार्टीचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मला जर एक खून माफ असता, तर मी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना गोळी मारली असती,” असे विधान सहनी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरच सर्व कारभार सुरू आहे. देशात लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान केला जात आहे. देशातील 140 कोटी जनतेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना चुकीच्या दिशेने ढकलले जात आहे. निवडणूक ही कोणत्याही नेत्यासाठी नसून देशातील जनतेसाठी असते. नेता योग्य काम करत नसेल तर त्याला खुर्चीवरून खाली खेचण्याचा अधिकार जनतेला आहे, असेही यावेळी मुकेश सहनी म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये सैन्य उभे करून आणि सुमारे 27 लाख मते रद्द करून सरकार स्थापन करण्यात आले. बिहार निवडणुकीत मतदारांच्या खात्यात 10-10 हजार रुपये जमा करून निवडणुका आपल्या बाजूने वळवण्यात आल्या, असा आरोप सहनी यांनी केला. तसेच निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिला नसून तो पूर्णपणे भाजपच्या ताटाखालचा मांजर बनला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

काळ नेहमी सारखा राहत नाही. देशाच्या संविधानाशी खेळ करणाऱ्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. मला जर एक खून माफ असता तर मी सर्वात आधी ज्ञानेश कुमार यांना गोळी मारली असती. पण काय करणार, आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, असेही ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात ज्ञानेश कुमार सुटणार नाही सरकार बदलताच त्यांना तुरुंगात टाकले जाईल आणि ज्यांनी ज्यांना त्यांना साथ दिली ते सुद्धा तुरुंगात जातील, असेही सहनी म्हणाले.