
SIR प्रक्रियेत आतापर्यंत देशभरातील 13 कोटींपेक्षा अधिक नावे मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. या प्रक्रियेविरोधात मतदारांकडून आक्षेप नोंदवले जात असताना विरोधी पक्षांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी महत्त्वाची घोषणा केली. राहुल गांधी आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “संविधानाचे शत्रू समोर आले आहेत. न्याय मिळेल. मी सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. VoteChori” अशी माहिती दिली.
मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेवरून सध्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांपैकी दोन आयुक्तांनी विविध निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचे वृत्त समोर आले होते. सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी 10 महिन्यांच्या कालावधीत किमान 14 वेळा काही निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. SIR प्रक्रिया थांबवणे, निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेची तपासणी करण्याची मागणी विविध विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आयुक्तांमधील चर्चा ही संस्थात्मक प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.



























































