
सामना प्रतिनिधी, कर्जत
माथेरान मिनी ट्रेनच्या १११ वर्षाच्या इतिहासात एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली. नॅरोगेज रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक म्हणून एका महिलेला संधी मिळाली. नेरळ माथेरान मिनीट्रेन या गाडीवर शुभांगी खोब्रागडे या महिलेने साहाय्यक चालक म्हणून काम करत हे आव्हान स्वीकारले.
आजच्या युगात पुरुषांच्या बरोबरीला महिला देखील उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अनेक क्षेत्रात महिलांनी स्वतःला सिद्ध केले आहे. गेल्या ६ वर्षांपासून कुर्ला येथील डिझेल लोको शेडमध्ये कार्यरत असलेली नागपूरची कन्या शुभांगी खोब्रागडे यांची नियुक्ती २० जूनपासून नेरळ माथेरान सेक्शनमध्ये नेरॉगेज रेल्वे मार्गावर साहाय्यक पायलट म्हणून करण्यात केली. यावेळी वरिष्ठ पायलट आर.जी.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानची राणी अर्थात मिनी ट्रेनची यशस्वी सफर करून नवा इतिहास घडविला आहे. यावेळी नेरळ येथून मिनी ट्रेन घेऊन दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रवास सुरू केला आणि सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास माथेरान स्थानकात मिनी ट्रेन येऊन विसावली. या नेरॉगेज रेल्वे मार्गावर सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती झाल्याने मी स्वतःला नशीबवान समजते असे समाधान व्यक्त करत आपला विलक्षण अनुभव यावेळी शुभांगी खोब्रागडे यांनी सांगितला.
पर्यटकांचे खास आकर्षण असलेली माथेरानच्या मिनी ट्रेन सेवेत पर्यटकांना अधिक सुखसुविधा मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासन एक पाऊल पुढे टाकत मिनी ट्रेन सोबत विदेशी पर्यटकांना प्रामुख्याने वाफेवर चालणारे इंजिन आकर्षित करीत असते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वाफेवरचे इंजिन डीझेलमध्ये परिवर्तित करून प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज केले आहे. येणाऱ्या काळात मिनी ट्रेनच्या पुर्वीच्या नियोजित सर्व फेऱ्या सुरू करून नेरळ माथेरान नेरॉगेज मार्गावर रेल्वे क्रांती करण्याच्या दृष्टीने या रेल्वे मार्गावर चालकांची संख्या वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा हा प्रयत्न असल्याचे समजते. यासाठी प्रथमच महिला साहाय्यक पायलटला या मार्गावर संधी मिळाल्याने मिनी ट्रेनची सफर ऐतिहासिक मानली जात असल्याने यावेळी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांनी शुभांगी यांचे नेरळ माथेरान सेक्शनमध्ये स्वागत केले.




























































