पाणी भरण्याच्या वादातून अल्पवयीन मुलाकडून कोयत्याने वार, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नळावर पाणी भरताना झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास पुण्यातील साठे वस्तीवर घडली. याप्रकरणी  विमानतळ पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

साठेवस्ती येथील सार्वजनिक पाण्याच्या नळावर अनुसया हिरामण पवार (35) या पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.  त्यावेळी पाणी भरण्याच्या कारणावरून बालाजी ढोकळे यांनी अनुसयाला शिवीगाळ केली. त्यामुळे बालाजी आणि अनुसया यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. तेव्हा तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर ही भांडणे मिटली.  मात्र काही वेळाने अनुसया यांचा मुलगा योगेश घरासमोर उभा असताना बालाजी ढोकळे यांचा अल्पवयीन मुलगा तेथे आला. त्याने कोयत्याने योगेशच्या डोक्यात आणि मानेवर वार केले. यामध्ये योगेश गंभीर जखमी झाला. त्यावेळी योगेशला वाचवण्यासाठी त्याची आई अनुसया याही मध्ये पडल्या. त्यामुळे त्यांनाही बालाजी ढोकळे, त्यांच्या पत्नी लक्ष्मी ढोकळे आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा या तिघांनी मिळून काठीने मारहाण केली.

याप्रकरणी अनुसया यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बालाजी ढोकळे, लक्ष्मी बालाजी ढोकळे यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास विमानतळ पोलीस करत आहेत.