२२व्या आठवड्यात जन्माला आलेलं बाळ सुखरूप

155

सामना ऑनलाईन । मुंबई

शीर्षक वाचून चक्रावला असाल ना? २२आठवड्यांचं बाळ आणि तेही सुखरूप? हो पण हे शक्य झालं आहे. एखाद्या चमत्कारासारखं २२ आठवड्यांचं बाळ जिवंत राहिलं आहे. निर्वाण या नावाचं हे बाळ कमी कालावधीत प्रसूत झालेलं देशातलं पहिलं बाळ ठरलं आहे. आणि जन्मल्या जन्मल्याच मृत्यूशी यशस्वी लढा देणारा निर्वाण हा ‘मिरॅकल बेबी’ सूर्या हॉस्पिटलमधील नवजात अतिदक्षता विभागात १३२ काढल्यानंतर अखेर आपल्या घरी जाणार आहे. निर्वाणचे पालक आणि सूर्या हॉस्पिटलमधील १४ डॉक्टर व ५० नर्सिंग कर्मचारी यांच्यासाठी हे वास्तवात उतरलेलं स्वप्न आहे. निर्वाणच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या सर्वांनी कित्येक रात्री जागून काढल्या होत्या. त्यामुळे त्याला सुखरूप घरी जाताना पाहून हे सर्व जण अत्यंत आनंदी झाले आहेत.

१२ मे २०१७ रोजी रितिका बजाज आणि विशाल सिंग यांच्या आयुष्यातएक अघटित घडना घडली. गर्भधारणेच्या केवळ २२व्या आठवड्यात निर्वाणचा जन्म झाला. त्या वेळी त्याचे वजन ६१० ग्रॅम होते, डोक्याचा आकार २२ सेंटिमीटर होता आणि लांबी केवळ ३२ सेंटिमीटर होती. पण आपण ‘मिरॅकल मायक्रोमॅन’ असल्याचं या नवजात बालकाने दाखवून दिलं. गर्भावस्थेच्या केवळ २२व्या आठवड्यात जन्मलेला आणि परिस्थितीवर मात करून जिवंत राहिलेला हे सर्वात चिमुकला जीव आहे. प्रतिकूल परिस्थितीत जन्मल्यानंतर पहिल्या १० मिनिटांमध्ये (ज्याला गोल्डन इनिशिअल १० मिनिट्स म्हणतात) कुशल नवजात तज्ज्ञांच्या टीमतर्फे निर्वाणची वेळेवर काळजी घेण्यात आली आणि १५ मिनिटांतच त्याला नवजात अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. या विभागात गेले चार महिने निर्वाणच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं होतं.

सूर्या चाइल्ड केअरचे संचालक डॉ. भूपेंद्र अवस्ती म्हणाले, “जन्मापासूनच निर्वाणची फुफ्फुसे अपरिपक्व होती. त्यामुळे प्रसूतीगृहापासूनच त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली होती. त्याला १२ आठवडे श्वसनासाठी मदत द्यावी लागली. त्यापैकी ६ आठवडे तो व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या फुफ्फुसांचे प्रसरण व्हावे यासाठी त्याच्या श्वसननळीमध्ये (ब्रिदिंग ट्युब) पृष्ठक्रियाकारी (सरफंक्टन्ट) इंजक्शन्स समाविष्ट करण्यात आली होती. या कालावधीत त्याला न्यूमोथोरॅक्स (फुफ्फुसांभोवती हवा साचणे) आणि मेंदूतील रक्तस्त्राव झाला होता. पण त्यावरही त्याने मात केली. त्याला स्वत:हून श्वासोच्छवास घेता यावा यासाठी महिनाभर स्टेरॉइड ट्रीटमेंट देण्यात आली. स्टेरॉइड ट्रीटमेंटमुळे संसर्ग आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढण्याचा धोका होता. त्यासाठी प्रतिजैविके आणि इन्सुलिनने उपचार देणे आवश्यक होते. या कालावधीत अनेकदा रक्त संक्रमण, डोळ्यांसाठी लेझर ट्रीटमेंट आणि हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. वयाचे तीन महिने पूर्ण झाल्यावरच तोंडावाटे अन्न देणे शक्य होते.

“निर्वाण हा सहजासहजी हार मानणारा नसून, तो एक विजेता आहे, हे या टीमला सहा आठवड्यांनी दिसून आले. त्या वेळी त्याचा व्हेंटिलेटर काढण्यात आला. त्याचे वजन १ किलो होते आणि पूर्ण दुग्धपानही सुरू झाले होते. त्यानंतरचे ६ आठवडे त्याला ‘नॉन इन्व्हेसिव्ह’ श्वसन मदत देऊ केली होती. वयाचे तीन महिने पूर्ण झाल्यानंतरच त्याला तोंडावाटे आहार आणि स्तनपान सुरू करता येणार होते. हृदय आणि मेंदूचे स्कॅन, हाडांच्या घनतेची तपासणी, श्रवणयंत्रणेची तपासणी, त्वेचेची निगा, फिजिओथेरपी, लॅक्टेशन (दुग्धन) मदत अशा विविध वैद्यकीय शाखांची मदत घेण्याची आवश्यकता लागली. त्याचप्रमाणे वैद्यकीय टीमकडून कुटुंबियांनाही नियमितपणे मानसिक आधार आणि समुपदेशन देण्यात आले.”, असे डॉ, अवस्ती यांनी सांगितले.

गर्भधारणेच्या २२ ते २४ आठवड्यांच्या काळात जन्मलेल्या मुलांना पेरिव्हाएबल म्हणतात. या नवजात बालकांनी भ्रूणाची अवस्था नुकतीच पार केलेली असते. २२व्या आठवड्याआधी आधी भ्रूण आणि माता वेगवेगळे यांचे अस्तित्व नसते. एखाद्या नवजाततज्ज्ञासाठी आणि बालरोगतज्ज्ञासाठी २२ आठवड्यांनी प्रसूती झालेल्या अल्ट्रा प्रिमॅच्युअर नवजात बालकावर उपचार करण्याहून मोठे आव्हान असूच शकत नाही. गर्भधारणेपासून २२ व्या आठवड्यात प्रसूत झालेल्या बाळांपैकी ४०-५०% नवजात बालके मृतवत जन्माला येतात, असे जगभरातील प्रमाण आहे. जी बाळे जिवंतपणे जन्माला येतात त्यांच्यापैकी केवळ ५% जगतात. अमेरिकेतील एनआयसीएचडी (निओनॅटल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंट) या संस्थेच्या अहवालानुसार जिवंतपणे जन्मलेल्या बाळांपैकी २% बालके डिस्चार्ज मिळेपर्यंत जिवंत राहतात आणि केवळ १% बालके सामान्य मेंदूविकास झालेली असतात. फ्रान्समधील मोठ्या लोकसंख्येवर आधारित पाहणीनुसार (EPIPAGE 2) अशा बाळांमध्ये जगण्याचे प्रमाण शून्य % असते, असे नोंदवले आहे.

या परिस्थिती जन्मून त्यानंतरही जगलेल्या बालकांना सेरेब्रल पाल्सी, मतिमंदपणा, बहिरेपणा, अंधत्व, अपस्मार अशी मेंदूविकासातील व्यंगे उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे विकसित देशांमध्येसुद्धा गर्भधारणेच्या २२ व्या आठवड्यात जन्मलेल्या बालकांपैकी २०% बालकांना सक्रियपणे पुनरुज्जीवीत किंवा जगवण्यासाठी उपचार देण्यात येतात. ८०% बालकांवर प्रसूतीगृहात उपचार करण्यात येतात. देशातील पहिले २४ व्या आठवड्यात प्रसूती झालेले बाळ ‘सूर्या’ हे सुद्धा येथून (मार्च २०११) डिस्चार्ज घेऊन बाहेर पडले. साक्षी ही २३ व्या आठवड्यात प्रसूत झालेली मुलगीसुद्धा सूर्या हॉस्पिटलमधून सुखरूप डिस्चार्ज घेऊन बाहेर पडली. दोन वर्षांनी आम्ही आमचाच विक्रम मोडला आहे, हे पाहता अशा मायक्रोप्रेमिजना (कमी आठवड्यांमध्ये प्रसूती झालेली बाळे) जगवणे कठीण आहे पण अशक्य नाही, हे सिद्ध होते.

आपली प्रतिक्रिया द्या