
शेतकर्यांच्या प्रश्नांवर 13 महिने आंदोलन करण्यात आले. त्यात साडेसातशे शेतकर्यांचे मृत्यू झाला. तरीही पंतप्रधान हे मन की बात मध्ये गुंतले होते. शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी, मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्यांची विचारपूस करण्यासाठी या सरकारला वेळ नसेल तर आता जागृत व्हा आणि खर्या अर्थाने शेतकर्यांचे सरकार या राज्यात आणि देशात आणण्यासाठी कटिबध्द व्हा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले. अब की बार किसान सरकार अशी घोषणाच त्यांनी सभेत केली. नांदेडच्या हिंगोली गेट मैदानात आयोजित विराट सभेत त्यांनी ही घोषणा केली.
शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात आजपर्यंत आलेल्या सरकारमध्ये तळमळ नाही, शेतकर्यांना वीज मिळते का, पाणी मिळते का, बी-बियाणे मिळतात का, याचा गांभीर्याने विचार करण्याची क्षमता या सरकारमध्ये नसेल तर त्याचा काय फायदा असा सवालही त्यांनी केला. एकूण पडणार्या पावसापैकी 50 हजार टीएमसी पाणी समुद्रात वाहुन जाते, देशात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे. मग शेतकर्यांना पूर्णवेळ वीज का मिळत नाही, समुद्रात जाणार्या पाण्याचे नियोजन करण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही, शेतकर्यांसाठी काही करण्याची दानत नाही, नव्हे त्यांच्या मनातच नाही, हजारो शेतकर्यांच्या रोज आत्महत्या या राज्यात गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारला वेळ नाही, त्यामुळे आता संघर्ष करण्याची आणि शेतकर्यांचे सरकार आणण्याची संधी आहे, असेही ते म्हणाले.
मेक इन इंडियाच्या माध्यमातून देश स्वयंपूर्ण करण्याची घोषणा मोदी सरकारने केली. मात्र गेल्या नऊ वर्षात मेकइन इंडियाचे स्वप्न धुळीला मिळाले आणि ते जोक इन इंडिया मध्ये बदलले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चायना मेड माल मिळतो आहे. त्यात पतंग, फटाके, गणेशमूर्ती, अन्य सुशोभिकरणाच्या वस्तू या सर्व चीनच्या आहेत, मग कुठे गेले यांचे मेक इन इंडिया असा सवाल त्यांनी केला. गेल्या नऊ वर्षात तेलंगणामध्ये आम्ही या सर्व बाबीचा अभ्यास करुन आता शेतकर्यांना मोफत वीज, मोफत पाणी, पाणीपट्टी पूर्णतः रद्द, सोबतच शेतकर्यांना दहा हजार रुपयांचे प्रति एकरी अनुदान देत शेतकर्यांना स्वयंपूर्ण केल्याने आमच्या सरकारला शेतकर्यांचे आशिर्वाद मिळत आहेत. 60 वर्ष या देशात काँग्रेसने राज्य केले, तर गेल्या नऊ वर्षात भारतीय जनता पक्षाने सत्ता चालवली. मात्र मोदी सरकारला शेतकर्यांचे हित का करता आले नाही, असा सवालही त्यांनी केला. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, राजकीय पक्षाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घ्यायची आणि सत्ता मिळवायची मात्र त्यानंतर मनमानी करायची, हे आता यापुढे चालणार नाही.
यापुढे बीआरएसचे प्रत्येक कार्यकर्ते गावागावात जातील. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद घेवून एकाचवेळी राज्यातील 288 मतदार संघात आमचे कार्यकर्ते जावून शेतकर्यांशी हितगूज करतील आणि त्यांचे प्रश्न समजून घेतील नव्हे त्यांची एकजूट निर्माण करतील, या येणार्या काळात आपण सर्वजण शेतकर्यांचे सरकार या राज्यात व देशात आणण्याचा संकल्प यानिमित्ताने करु, सभा झाल्यानंतर प्रत्येक गावात जावून याचा प्रचार करुन शेतकर्यांनी एकजूट होवून कुणाच्याही भुलावणीला बळी न पडता संघटीत होण्याचे वचन यानिमित्ताने घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
तेलंगणामध्ये येवून कुठल्याही भागात जावून शेतकर्यांना विचारा तेथील शेतकरी तुम्हाला अनुभव सांगतील. आमच्या राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्या, तुमच्या राज्याचे बजेट तर आमच्यापेक्षाही दुप्पट आहे. पाच हजार कोटींचे बजेट असताना या राज्यातील सरकारने शेतकर्यांसाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी केला. केवळ शेतकर्यांसाठीच नाही तर बेरोजगार, दिनदलित, कष्टकरी यांच्यासाठी आमच्याकडे मोठ्या योजना सुरु झाल्या. शेतकर्यांचा माल त्यांच्या समाधानकारक भावाने आम्ही खरेदी करतो, त्यामुळे येथील शेतकरी समाधानी झाला आहे हे आम्हाला जमले तर देशात व राज्य सरकारांना का जमले नाही, असा सवाल करुन उठा संघटीत व्हा व संघर्ष करुन या राज्यात व देशात शेतकर्यांचे सरकार आणण्यासाठी कटीबध्द व्हा, असे आवाहन के.चंद्रशेखर राव यांनी केले.
तेलंगणा राष्ट्र समितीने गेली नऊ वर्ष तेलंगणात राज्य केल्यानंतर आपल्या पक्षाचा विस्तार देशभर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे भारत राष्ट्र समिती या नावाने नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करुन तसा रितसर अर्ज दिला. 17 सप्टेंबर रोजी हा अर्ज निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर त्यास मान्यता मिळाली आणि प्रत्यक्षात 1 नोव्हेंबरपासून या पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी वेगवेगळ्या राज्यात आपले प्रतिनिधी पाठविले. महाराष्ट्रात गेल्या चार आठवड्यापासून त्यांचे प्रतिनिधी शेतकरी, मतदार यांच्याशी हितगूज करत आहेत. तेलंगणा सरकारने नऊ वर्षात शेतकर्यांसाठी काय केले याची माहिती देत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा नांदेडमध्ये के.चंद्रशेखर राव यांनी पहिली सभा आज घेतली.





























































